
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याला शुक्रवारी वेगळे वळण मिळाले. सरकार पक्षाचे वकील उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांना या खटल्यातून बाजूला करण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज सुदर्शन घुलेसह इतर आरोपींनी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 23 जानेवारी रोजी होणार आहे.
बीड येथे आज मकोका न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली. सरकार पक्षाच्या वतीने ऍड. बाळासाहेब कोल्हे यांनी पहिला युक्तिवाद केला. त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना तांत्रिक मुद्दे उपस्थित करून काही पुराव्यांना आक्षेप घेतला. जे व्हिडीओ येथील न्यायालयाच्या पुराव्यांच्या यादीत नाहीत ते उच्च न्यायालयात दाखवून खटल्याला भावनिक स्वरूप देण्यात येत आहे. घटनेचे व्हिडीओ अगोदर आरोपींना देण्यात यावेत आणि त्यानंतरच आरोप निश्चित करण्यात यावेत, अशी मागणीही आरोपींच्या वकिलांनी केली. त्यावर सरकार पक्षाच्या वतीने आजच हे सर्व व्हिडीओ आरोपीच्या वकिलांना देण्याचे मान्य केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांना या खटल्यातून बाजूला करण्यात यावे, अशी मागणी सुदर्शन घुले, महेश केदार, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे यांनी केली. आरोपींच्या या मागणीमुळे न्यायालयात खळबळ उडाली.
आरोपी घुले चक्कर येऊन पडला
सरकारी वकील निकम यांना या प्रकरणातून हटवावे, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. या मागणीला सरकारी पक्षाने जोरदार प्रत्युत्तर देत यासंदर्भातील अर्ज फेटाळण्याची मागणी न्यायालयाकडे केली. या दरम्यान न्यायाधीशांनी सुदर्शन घुले या आरोपीचे नाव पुकारले तेव्हा तो अचानक न्यायालयात चक्कर येऊन पडला.
चाटेकडून खंडणीची मागणी
विष्णू चाटेकडून वारंवार अवादा कंपनीच्या अधिकाऱयांकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याचे सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान अवादा कंपनीच्या अधिकाऱयांनी मोबाईलमधील डेटा लॅपटॉपमध्ये कॉपी करून मूळ डेटा डिलीट केल्याची माहिती तपास अधिकाऱयांनी न्यायालयात दिली.



























































