200 पोलीस हजारो मद्यधुंदांना हाताळू शकणार नाहीत! सनबर्न फेस्टिव्हलमध्ये दारूला परवानगी देण्याचा फेरविचार करण्याचे निर्देश

मुंबईतील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये दारू विक्रीस परवानगी दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 200 पोलीस हजारो मद्यधुंदांना हाताळू शकणार नाहीत, असे फटकारत सनबर्न फेस्टिव्हलमध्ये दारूला परवानगी देण्याचा फेरविचार करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

शुक्रवार, 19 डिसेंबरपासून सुरू होणारा सनबर्न फेस्टिव्हल 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. हा फेस्टिव्हल, शिवडी येथील इन्फिनिटी बे येथे, टिंबर पॉड प्लॉटजवळ, अटल सेतूच्या खाली आयोजित करण्यात आला आहे. पहिल्यांदाच मुंबईत होणाऱया कार्यक्रमात दारू विक्रीदेखील केली जाणार असल्याने सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत शहरातील रहिवासी चिंतामणी सारंग यांनी हायकोर्टात याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर आज शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने सनबर्न फेस्टिव्हलमध्ये दारूला परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावेळी राज्य सरकारतर्फे बाजू मांडणारे महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी खंडपीठाला सांगितले की, अधिकाऱयांना कायदा व सुव्यवस्था राखणे शक्य होईल, मात्र खंडपीठ त्यांच्या उत्तराने समाधानी झाले नाही. आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या आहेत, उपचारात्मक उपाययोजना नाहीत, काहीही होऊ शकते. लोक दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. खुल्या जागेत कोणीही मद्यधुंद अवस्थेत फिरू शकत नाही. त्यांच्यासाठी कायदा वेगळा का असावा, असा सवाल विचारत न्यायालयाने सरकारला खडसावले.

न्यायालय म्हणाले…

z आम्ही याचिका प्रलंबित ठेवत आहोत. दुसरी याचिका कधी दाखल होईल हे आम्हाला माहीत नाही. हीच संधी आहे. तुम्ही अशा प्रकारे दारूचे परवाने देऊ शकत नाही, आम्ही कायदा स्पष्ट करू, असे न्यायालय म्हणाले.
z 40 हजारांपेक्षा जास्त लोकांच्या गर्दीसाठी आणि तेही खुल्या जागेत अशा प्रकारे दारूचा परवाना देणे अयोग्य आहे.