गाणे जणू सहय़ाद्रीच्या हिरवाईचे! साहित्य संमेलनाच्या गीताचे लोकार्पण

सातारा जिल्ह्याचे भौगोलिक महत्त्व अधोरेखित करत मराठी भाषा, मराठी बाणा, भाषेच्या संघर्षाचे, मराठय़ांच्या राजधानीचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज यांच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडवित सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सामाजिक योगदानाचे प्रतिबिंब दर्शविणारे ‘हे शतकपूर्व संमेलन साताऱयाचे; गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे’ या संमेलन गीतातून घडले.

निमित्त होते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी खास तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताच्या लोकार्पण सोहळ्याचे! संमेलन गीताचे लोकार्पण प्रसिद्ध कवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) यांच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, संमेलन गीताचे लेखक राजीव मुळ्ये, गायक विनल देशमुख व्यासपीठावर होते.

गीत महासागराला अर्पण – डॉ. विठ्ठल वाघ

डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले, कोणत्याही संस्थेचे, कार्यक्रमाचे गीत लिहिणे सोपे नाही. ती प्रतिभावंतांची एक प्रकारची कसोटीच असते. हे गीत लेखणीचा जोर, ताकद, सामर्थ्य आजमावीत असते.या गीतामधून संमेलनासारख्या महासागराचा कार्यविस्तार, रूपरेषा, संमेलनस्थळाची महती, भूमीचा इतिहास, परंपरा, भवताल यांना मुठीत पकडले आहे. हे गीत म्हणजे महासागारातून दोन ओंजळी पाणी घेऊन त्या सागरालाच अर्घ्य अर्पण करण्याप्रमाणे आहे.