बोलीभाषेची समृद्धी – मिश्किल मालवणी

>> स्वप्नील साळसकर

मराठी भाषेची नाळ जोडलेली मालवणी बोलीभाषा महाराष्ट्रातच काय तर परदेशी पर्यटकांनाही चांगलीच भावली. सिंधुदुर्गात येणारा देशी – विदेशी पर्यटक येथील आदरातिथ्य, अत्यंत आपुलकी, प्रेम आणि हेलकाव्याच्या बोलण्यामुळे भारावून जातो. बारा कोसांवर बोलीभाषा बदलते असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे उत्तरेस विजयदुर्ग खाडीपासून दक्षिणेस किरणपाणी नदीपर्यंत पसरलेला 5207 चौ. कि.मी एकूण क्षेत्रफळ असलेला सिंधुदुर्ग जिल्हा हा वर्तमान काळात मालवणी मुलुख म्हणून ओळखला जातो. प्रचलित रुढीनुसार सिंधुदुर्ग जिह्यातील कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी, देवगड व वैभववाडी या आठ तालुक्यांमध्ये बोलल्या जाणाऱया बोलीला मालवणी असा संबोध आहे. मालवणी बोलीच्या अभ्यासक विद्या प्रभू यांनी मालवणी आणि संस्कृतचे ऋणानुबंध तिच्या जन्मापासून असल्याचं म्हटले आहे. मालवणी बोली भाषेचा सर्वत्र बोलबाला झाला तो गंगाराम गवाणकर लिखित वस्त्रहरण या नाटकामुळे. साधारण 175 व्या प्रयोगाला हजर असलेल्या

पु. ल. देशपांडे यांनी संपूर्ण मालवणी बोलीतील या नाटकाची प्रशंसा केली आणि वस्त्रहरण वेगात सुटले.

मुंबई, पुणेसारख्या शहरात राहणारा चाकरमानी एकमेकांना भेटतो. त्यावेळी दोघांच्या संभाषणावरून तो तालुका ओळखतो ही खासियत आहे आणि यातूनच मग मैत्रीचे एक वेगळे नाते दृढ होते ते म्हणजे मला भेटलेला व्यक्ती माझ्या जिह्यातील आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात किरडू (सरपटणारे कोणतेही जनावर) अशी नोंद आहे. सरपटणाऱया जनावराला ओळख पटायच्या अगोदर पटकन उच्चारला जाणारा हा प्रसिद्ध शब्द मुलखात सर्वत्र वापरला जातो.

मूळ मराठी शब्द (इकडे) वैभववाडीमध्ये इकडे हा सर्रास प्रचलित मराठी शब्द वापरला जातो. देवगड – वेंगुर्ला- हकडे, हकडेन, कुडाळ, मालवण, सावंतवाडी – हडे, कणकवली, दोडामार्ग – हयसर असा शब्दांचा साधारण प्रयोग बदलतो. मालवणी मुलखात देवाकडे जी गाऱहाणे घातली जातात ती वर्षानुवर्षे मालवणी बोलीतीलच आहेत. होय म्हाराजा म्हणत बाकीचे लोक त्याची री ओढतात तो शब्द म्हणजे `व्हय म्हे राजे’. उदा. `बा देवा म्हाराजा, गावच्या अधिकारी, आज गावघर बारा पाच मानकरी, सेवेकरी, रयत, रोंबावळ सालाबादप्रमाणे ह्या वार्षिक करतहत. तुका ह्या भरलेला फळ ठेवून आठवण केलेली आसा, ती तू मान्य कर.’

मालवणी बोलीत खटकेबाजपणा, मिश्किलता दशावतारातील संकासूर पात्राच्या संवादातून दिसते.