आता हिवाळाच्या सुट्टीतही न्यायालयीन कामकाज सुरू राहणार, सरन्यायाधीश सुर्य कांत याचा निर्णय

न्यायपालिकेत साधारणतः सुट्ट्यांचा काळ शांततेचा मानला जातो. मात्र यंदा हिवाळी सुट्टीतही न्यायालयीन कामकाज सुरू राहणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी मोठा निर्णय घेत हिवाळी अवकाशातही न्यायालय बसवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 22 डिसेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात विशेष खंडपीठ बसणार असून, त्या दिवशी महत्त्वाच्या आणि तातडीच्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या दैनंदिन कारणसूचीनुसार 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता न्यायालयीन कामकाज सुरू होईल. ही एक विशेष व्हेकेशन बेंच असेल, जी प्रामुख्याने महत्त्वाच्या दिवाणी प्रकरणांवर सुनावणी करणार आहे. या खंडपीठाचे अध्यक्षपद स्वतः मुख्य न्यायाधीश सूर्यकांत भूषवतील, तर त्यांच्यासोबत सरन्यायाधीश जोयमाल्या बागची हे सदस्य असतील.

या विशेष सुनावणीसाठी ‘फ्रेश अ‍ॅडमिशन’ अंतर्गत अनेक महत्त्वाच्या याचिका सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ‘माहिका इन्फ्रा एलएलपी विरुद्ध मनीषा कन्स्ट्रक्शन्स’ यांसारख्या प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणांची तातडीची सुनावणी व्हावी, यासाठी संबंधित पक्षांकडून ‘मेंशन मेमो’द्वारे विनंती करण्यात आली होती.

सुट्ट्यांच्या काळातही न्यायालयाचे कामकाज चालवण्यामागील उद्देश असा की, दीर्घकाळ प्रलंबित ठेवता न येणाऱ्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रकरणांवर त्वरित निर्णय घेता यावा. सामान्यतः हिवाळी सुट्टीत न्यायालये बंद असतात, मात्र या निर्णयातून न्यायाच्या मार्गात सुट्ट्या कधीही अडथळा ठरत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा निर्णय दिलासादायक मानला जात आहे.

या विशेष खंडपीठासाठी सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. सूचीबद्ध प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारे सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाचा प्रयत्न आहे की त्या दिवशी यादीतील सर्व विविध प्रकरणांची सुनावणी पूर्ण करून निकालाच्या दिशेने पावले टाकली जावीत.

हिवाळी सुट्टीतही न्यायालय बसल्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा बोजा कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. देश सुट्ट्यांच्या वातावरणात असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या दालनांत न्यायाची प्रक्रिया सुरू राहणार असून, ही पायरी न्यायाच्या सातत्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.