
‘मनरेगा हे एक क्रांतिकारी पाऊल होते. या योजनेने मागच्या 20 वर्षांत कोटय़वधी कुटुंबांना आधार दिला. दुर्दैवाने मोदी सरकारने ‘मनरेगा’वर मनमानीपणे बुलडोझर चालवला. हा शेतकरी, कष्टकरी व गरीबांच्या हितावर हल्ला आहे,’ अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर केली.
‘मनरेगा’च्या जागी केंद्र सरकारने ‘जी राम जी’ योजना आणली आहे. सोनिया गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करून मोदी सरकारच्या या निर्णयावर आसुड ओढले. ‘मनरेगा योजनेमुळे कोटय़वधी गरीब व ग्रामीण कुटुंबांना फायदा झाला, वंचित, शोषित, गरीब, अतिगरीब लोकांना रोजीरोटी मिळाली, रोजगारासाठी कुटुंब सोडून जाण्यास आळा बसला, रोजगाराचा कायदेशीर हक्क मिळाला, ग्रामपंचायतींना ताकद मिळाली, महात्मा गांधी यांच्या ग्राम स्वराज्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे एक पाऊल होते. कोविडच्या काळात ही योजना संजीवनी ठरली होती, असे त्या म्हणाल्या.
‘मागच्या 11 वर्षांत केंद्राने मनरेगा कमकुवत करण्यासाठी प्रयत्न केले. आता ती पुरती संपवली गेली. या योजनेतून केवळ महात्मा गांधी यांचे नाव हटवले गेले नाही, तर कोणालाही विश्वासात न घेता योजनेचे स्वरूपच बदलून टाकले. आता कोणाला, कुठे आणि किती रोजगार मिळणार हे सरकार दिल्लीत बसून ठरवणार,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला.
लढण्यासाठी कटिबद्ध
‘मनरेगा आणण्यात काँग्रेसचे मोठे योगदान होते, मात्र याचा पक्षाशी संबंध नव्हता. ही देशहिताची आणि जनहिताची योजना होती. मोदी सरकारने हा कायदा कमकुवत करून देशातील कोटय़वधी शेतकरी, कष्टकरी आणि गरीबांच्या हितावर हल्ला केला आहे. या हल्ल्याचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत. 20 वर्षांपूर्वी रोजगाराचा हक्क मिळवून देण्यासाठी मी लढले होते, आजही माझ्यासह संपूर्ण काँग्रेस पक्ष नव्या काळय़ा कायद्याच्या विरोधात लढण्यासाठी कटिबद्ध आहे, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

























































