
मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होताच लागलेल्या आचारसंहितेनंतर पालिकेने शहर व उपनगरातील बेकायदा होर्डिंगवर धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या पाच दिवसांत पालिकेने तब्बल 6,347 जाहिरात फलक हटवले आहे.
आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाने तातडीने बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. यानुसार उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या नेतृत्वाखाली 15 डिसेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत बेकायदेशीर होर्डिंग, बॅनर्स, स्टिकर्स, राजकीय होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सरकारी, सार्वजनिक व खासगी जागांवर लावण्यात आलेल्या 3,864 बॅनर्स, 624 होर्डिंग, 837 पोस्टर्स आणि 901 झेंडे हटविण्यात आले. तसेच 121 ठिकाणी भिंतींवर रंगवण्यात आलेल्या राजकीय मजकुरावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी, सार्वजनिक आणि खासगी जागांवरील फलक, भिंती, शौचालये, कार्यालये, कोनशिला व प्रवेशद्वारांवर लिहिलेली राजकीय पक्ष, नेते व लोकप्रतिनिधींची नावे कागदाने झाकणे किंवा रंगाने विद्रूप करणे अशी कारवाई 1,449 ठिकाणी करण्यात आली.

























































