सर्वोदयनगरात भाजप उमेदवाराच्या भावाची ईव्हीएम छेडछाड, शिंदे गटाचा आरोप

सर्वोदयनगरातील साऊथ इंडियन कॉलेजच्या मतदान केंद्रात भाजप उमेदवाराच्या भावाने ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला. त्याने मशीनला असलेले सील उघडून मतदान करवून घेतले असून दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, नाहीतर आंदोलन करू असा इशारा शिंदे गटाचे उमेदवार शैलेश भोईर यांनी दिला.

प्रभाग क्रमांक ५ मधील बुथ क्रमांक ७ ते १२ येथे मतदान साहित्य वितरणानंतर बुथची पाहणी करण्यासाठी शिंदे गटाचे उमेदवार शैलेश भोईर गेले होते. त्यावेळी त्यांना संशयास्पद हालचाली जाणवल्या. त्यांनी मशीनची तपासणी केली असता सहा ईव्हीएमचे सील उघडल्याचे त्यांना दिसले. या सर्व सहा मशीनमध्ये भाजपचे उमेदवार प्रजेश तेलंगे यांचा भाऊ तुषार तेलंगे याने छेडछाड केल्याचा आरोप भोईर यांनी केला. मशीन फोडून मतदान झाल्याचा दावाही त्यांनी केला. त्यानंतर निवडणूक सहाय्यक अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. प्राथमिक तपासणीत सर्व सहा बुथवरील मशीन सीलबंद असल्याचे सांगत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सविस्तर तपासणीचे आदेश दिले. तपासणी अहवालानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असेही गायकवाड म्हणाले.