उत्तर हिंदुस्थानातील धुक्यांचा हवाई वाहतुकीला फटका, अयोध्येतून मुंबईला निघालेली उड्डाणं रद्द

उत्तर हिंदुस्थानात दाट धुक्याचा फटका हवाई वाहतुकीला बसू लागला असून अयोध्या येथील महर्षी वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी 21 डिसेंबर रोजी दोन नियोजित कमर्शियल उड्डाणे रद्द करण्यात आली. एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय)ने याबाबत माहिती दिली आहे.

रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये एअर इंडिया एक्सप्रेसची दिल्ली–अयोध्या–दिल्ली मार्गावरील उड्डाणे आयएक्स1284/आयएक्स1274 तसेच स्पाइसजेटची मुंबई–अयोध्या–अहमदाबाद मार्गावरील उड्डाणे एसजी615/एसजी614 यांचा समावेश आहे.

वृत्तसंस्था एएनआयनुसार, अयोध्या परिसरात सलग दाट धुके पडत असल्याने दृश्यता मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. यामुळे विमानतळावर लो व्हिजिबिलिटी ऑपरेशनल प्रोसीजर्स लागू करावे लागले. सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाण संचालन शक्य नसल्याने ही उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एएआय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

उत्तर हिंदुस्थानात अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुक्याचा प्रभाव कायम असून, त्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर एएआयने रविवारी अ‍ॅडव्हायझरी जारी करत इशारा दिला आहे की, उत्तर भारतातील काही विमानतळांवर धुक्यामुळे दृश्यता प्रभावित होत असून उड्डाणे उशिराने होण्याची किंवा त्यात बदल होण्याची शक्यता आहे.

प्रवाशांना आपल्या उड्डाणांबाबतची अद्ययावत माहिती अधिकृत चॅनेल्सच्या माध्यमातून संबंधित एअरलाइन्सकडून तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच विमानतळावर वेळेआधी पोहोचून आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, खराब हवामानाच्या काळात प्रवाशांना मदत मिळावी यासाठी एएआयकडून प्रभावित विमानतळांवर पॅसेंजर असिस्टन्स टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. या पथकांकडून प्रवाशांना मार्गदर्शन तसेच आवश्यक ग्राउंड सपोर्ट दिला जाणार असल्याचे एएआयने स्पष्ट केले आहे.