BSF भरती नियमांत बदल, 50 टक्के रिक्त पदे माजी अग्निवीरांसाठी राखीव

केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलमधील भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करत जनरल ड्युटी कॅडरशी संबंधित नियमांमध्ये दुरुस्ती केली आहे. Border Security Force Act, 1968 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करत हा निर्णय घेण्यात आला असून, या नव्या नियमांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, जनरल ड्युटी कॅडर (नॉन-गॅझेटेड) रिक्रूटमेंट (अमेंडमेंट) रुल्स, 2025 असे नाव देण्यात आले आहे. हे नियम 18 डिसेंबर 2025 पासून लागू झाले आहेत.

या बदलाचा सर्वात मोठा फायदा अग्निपथ योजनाअंतर्गत सेवा पूर्ण केलेल्या युवकांना होणार आहे. गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, आता बीएसएफमध्ये दरवर्षी होणाऱ्या भरतीत एकूण रिक्त पदांपैकी 50 टक्के जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असतील. आधीच प्रशिक्षण घेतलेले, शिस्तबद्ध आणि कार्यानुभव असलेले युवक सुरक्षा दलांमध्ये स्थायी सेवेत यावेत, हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

नव्या नियमांनुसार, एकूण रिक्त पदांपैकी एक ठरावीक हिस्सा माजी सैनिकांसाठीही आरक्षित ठेवण्यात येणार आहे. यामुळे लष्करामध्ये पूर्वी सेवा दिलेल्या अनुभवी जवानांना प्राधान्य मिळणार आहे. त्याचबरोबर, कॉम्बेटाइज्ड कॉन्स्टेबल ट्रेड्समन यांना थेट भरतीद्वारे बीएसएफमध्ये समाविष्ट करण्याचा मार्गही खुला करण्यात आला आहे. यामुळे या वर्गातील कर्मचाऱ्यांना करिअरमध्ये पुढे जाण्याच्या अधिक संधी उपलब्ध होतील.

सरकारच्या या निर्णयाकडे अग्निपथ योजनेला अधिक बळ देणारे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. या बदलामुळे अग्निवीरांच्या भवितव्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता काही प्रमाणात दूर होईल, तसेच बीएसएफसारख्या महत्त्वाच्या सुरक्षा दलाला प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, सुधारित नियमांमुळे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विविध श्रेणीतील उमेदवारांसाठी आरक्षण आणि संधी आता स्पष्टपणे निश्चित केल्या गेल्याने भरती प्रक्रियेतील संभ्रम आणि वाद कमी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. एकूणच, हा बदल सुरक्षा दलांसह युवकांसाठीही लाभदायक ठरणार असल्याचे चित्र आहे.