बांगलादेशी समजून छत्तीसगडच्या मजुराची जमावाकडून हत्या, केरळमधील धक्कादायक घटना

रोजंदारीच्या कामाच्या शोधात केरळला गेलेल्या छत्तीसगडमधील एका तरुण मजुराची “बांगलादेशी” समजून जमावाने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील करही गावचा रहिवासी 31 वर्षीय रामनारायण बघेल याचा केरळमधील पलक्कड जिल्ह्यात अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे.

रामनारायण एका आठवड्यापूर्वीच रोजगाराच्या शोधात पलक्कड येथे पोहोचला होता. 17 डिसेंबर रोजी सायंकाळी वलयार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टापल्लम परिसरात काही स्थानिकांनी त्याला चोरीच्या संशयावरून अडवले. त्यानंतर त्याची भाषा आणि ओळख याबाबत चौकशी करत जमावाने त्याला बांगलादेशी ठरवले आणि कोणताही पुरावा नसताना बेदम मारहाण सुरू केली. पोलिसांच्या तपासात रामनारायणकडून चोरीशी संबंधित कोणतेही साहित्य आढळलेले नाही.

या घटनेचा एक भीषण व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, त्यात जमावाकडून केलेली अमानुष मारहाण स्पष्ट दिसते. अवघ्या 31 सेकंदांच्या या दृश्यांमध्ये रामनारायणला मारहाण करताना वारंवार “तू बांगलादेशी आहेस” असे म्हणण्यात येत असल्याचे दिसते.

मृत्यूनंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात रामनारायणच्या शरीरावर 80 पेक्षा अधिक जखमा आढळून आल्या आहेत. डॉक्टरांच्या मते, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, संपूर्ण शरीरावर खोल जखमा होत्या आणि प्रचंड रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. मारहाणीच्या वेळी त्याच्या छातीमधून रक्त वाहत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

या घटनेनंतर रामनारायणचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. त्याचे काका लखेश्वर बघेल यांनी सांगितले की, “तो केवळ कमाईसाठी केरळला गेला होता. बांगलादेशी समजून त्याला मारून टाकण्यात आले. तो अतिशय गरीब होता. त्याच्या लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी सरकारने मदत करावी.” रामनारायणच्या पश्चात पत्नी आणि 8 व 10 वर्षांचे दोन मुलगे आहेत.

या प्रकरणी केरळ पोलिसांनी वलयार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 18 डिसेंबर रोजी मुरली, प्रसाद, अनु, बिपिन आणि आनंदन या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, रामनारायणचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नव्हता.