
डिसेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात सोन्याच्या दरात संथ, पण सातत्यपूर्ण वाढ पाहायला मिळाली असली तरी चांदीने मात्र सर्वांनाच धक्का दिला आहे. अवघ्या 7 दिवसांत चांदीने दरात तब्बल 16 हजार रुपयांची ऐतिहासिक झेप घेतली आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे संकेत यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत ही तेजी आल्याचे मानले जात आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत साप्ताहिक स्तरावर किरकोळ वाढ झाली आहे. गेल्या आठवडय़ात 24 पॅरेट सोन्याच्या दरात 260 रुपयांची, तर 22 पॅरेट सोन्यात 250 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. सोन्याच्या तुलनेत चांदीने या आठवडय़ात मोठी चमक दाखवली आहे. 21 डिसेंबर रोजी चांदीचा भाव 2,14,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. चालू वर्षात चांदीने आतापर्यंत 126 टक्क्यांचा अभूतपूर्व परतावा दिला असून गुंतवणुकीसाठी चांदी आता पसंतीचा पर्याय ठरत आहे. जागतिक बाजारात चांदी 65.85 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
तेजी कशामुळे….
- अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर क्रिस्टोफर वॉलर यांनी व्याजदरात कपातीचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सोन्या-चांदीकडे वळला आहे.
- अमेरिकेतील कामगार बाजाराची आकडेवारी कमकुवत येत असल्याने डॉलरवर दबाव निर्माण झाला आहे, ज्याचा फायदा मौल्यवान धातूंना मिळत आहे.
- जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अस्थिरतेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीला मागणी वाढली आहे.

























































