चीनच्या हाती सोन्याचा जॅकपॉट, सापडला आशियातील सर्वात मोठा साठा

चीनच्या हाती मोठा खजिना लागला आहे. चीनने समुद्राखाली सोन्याचे मोठे भांडार शोधून काढले आहे. शेडोंग प्रांतातील लाइझोऊ किनाऱयाजवळ सोन्याचे साठे आढळून आले असून यामुळे चीनच्या एकूण सोन्याच्या साठय़ात लक्षणीय वाढ होणार आहे.

नव्या शोधानंतर लाइझोऊ परिसरातील एकूण सोन्याचा साठा 3,900 टनांपेक्षा (137.57 मिलियन औंस) अधिक झाला आहे. हा साठा चीनच्या एकूण सोन्याच्या साठय़ाच्या सुमारे 26 टक्के इतका आहे. या शोधामुळे चीन आता सोन्याचा साठा आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत जागतिक पातळीवर आघाडीवर असल्याचे मानले जात आहे.

चीनमध्ये अलीकडच्या काळात सलग मोठय़ा सोन्याच्या शोधांची मालिका सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये उत्तर-पूर्वेकडील लियाओनिंग प्रांतात 1,444.49 टनांहून अधिक लो-ग्रेड सोन्याचा साठा सापडला. याच महिन्यात शिनजियांग उइगूर स्वायत्त प्रदेशात, कुनलून पर्वतरांगांमध्ये 1,000 टनांपेक्षा अधिक सोन्याचे भांडार आढळून आले. यापूर्वी नोव्हेंबर 2023मध्ये शेडोंग प्रांताने जिओडोंग द्वीपकल्पात 3,500 टनांहून अधिक सोन्याचा साठा सापडल्याचा दावा केला होता.