आकाश ही कधीच मर्यादा नव्हती, हिंदुस्थानासाठी तर मुळीच नाही! अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी तरुणाईच्या स्वप्नांना दिले ‘अग्निपंख’

‘आकाश ही कधीच मर्यादा नव्हती आणि नसेल; माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही आणि हिंदुस्थानासाठी तर मुळीच नाही!’ अशा शब्दांत प्रसिद्ध अंतराळवीर आणि भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी रविवारी युवा पुणेकरांच्या गगनभरारीच्या स्वप्नांना निर्धाराचे ‘अग्निपंख’ दिले. ‘भारत 2040 मध्ये चंद्रावर उतरण्याची तयारी करत आहे. कदाचित तिथे पडणारे पहिले पाऊल तुमचे असू शकते. सातत्यपूर्ण प्रयत्न, चिकाटी, निर्धार व कठोर परिश्रमातून हे स्वप्न सत्यात उतरवा,’ अशी प्रेरणाही त्यांनी दिली.

‘ऑक्सिऑम-4’ मोहिमेद्वारे जून 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवून भारताची मान अवकाशात उन्नत करणाऱया शुभांशू शुक्ला यांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. या वेळी त्यांनी आपल्या अंतराळ मोहिमेचे रोमांचक अनुभव पुणेकरांसमोर मांडले. अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर 41 वर्षांनी अंतराळात प्रवेश करून इतिहास रचणारे दुसरे भारतीय ठरलेल्या शुभांशू यांच्याशी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (एनबीटी) संचालक युवराज मलिक यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘एनबीटी’चे अध्यक्ष मिलिंद मराठे, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल उपस्थित होते.

‘कसे आहात पुणेकर,’ अशी विचारणा करत ‘मला पुण्यात येऊन खूप आनंद झाला,’ असे शुभांशू शुक्ला यांनी सांगताच पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘मानवी मनात खूप उत्सुकता असते. याच उत्सुकतेतून आपण अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो. आपली ओळख कुटुंब, शाळा, शहर किंवा देश अशी असते. पण एकदा अंतराळात प्रवेश केल्यानंतर ‘पृथ्वी’ हीच तुमची एकमेव ओळख उरते. तिथून पृथ्वीकडे पाहताना ‘आपण सर्व एकच आहोत,’ ही भावना मनात निर्माण होते. पृथ्वी अत्यंत विशाल आणि सुंदर दिसते. मात्र, त्यापेक्षा महाकाय विश्व पाहताना निर्मात्या शक्तीबद्दलचा आदर वाढतो,’ असे शुक्ला यांनी प्रारंभी नमूद केले.

शुक्ला यांनी गगनयान आणि ऑक्सिऑममोहिमेच्या खडतर प्रशिक्षणाची माहिती दिली. ‘अवकाश यानाचे इंजिन सुरू झाल्यावर बसणाऱया धक्क्यांमुळे मी सर्व प्रशिक्षण क्षणभर विसरलो होतो. अवकाशात गुरुत्वाकर्षण नसल्याने शरीरात मोठे बदल होतात. उंची वाढते, भूक लागत नाही आणि पायातील रक्त डोक्याकडे सरकते. हे सर्व सहन करण्यासाठी मनाचा निग्रह महत्त्वाचा असतो,’ असे त्यांनी आवर्जून सांगितले. ‘प्रक्षेपणाच्या दिवशी अवकाश यानात जाण्यापूर्वी मी ’वंदे मातरम’ गीत ऐकले. त्यातून मला ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. अंतराळयानाने भारतावरून प्रवास केला, तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले होते,’ असेही त्यांनी सांगितले.

अंतराळवीरांसाठी प्रशिक्षण केंद्राची उभारणी सुरू

अंतराळात जाण्यापूर्वी अंतराळवीरांना देखभाल-दुरुस्तीपासून ते वैद्यकीय उपचारांपर्यंत सर्व प्रकारच्या कौशल्यांचे प्रशिक्षण आवश्यक असते. अवकाशयानात कसे वावरायचे, शून्य गुरुत्वाकर्षणात कसे राहायचे, याची सर्वांगीण तयारी करून घेतली जाते. यासाठी भारतात नवीन प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत असून, भारतीय अंतराळवीरांना या केंद्रात प्रशिक्षित होता येणार आहे.