
हिंदुस्थान हे एक ‘हिंदू राष्ट्र’ आहे आणि हे वास्तव स्वीकारण्यासाठी कोणत्याही घटनात्मक मान्यतेची किंवा अधिकृत शिक्कामोर्तबाची गरज नाही, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
‘हे सूर्यप्रकाशासारखे सत्य’ संघाच्या १०० व्या वर्षानिमित्त कोलकाता येथे आयोजित ‘१०० व्याख्यानमाला’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भागवत म्हणाले, ‘सूर्य पूर्वेला उगवतो, हे सत्य आहे. त्यासाठी आपल्याला कोणाच्या घटनात्मक मान्यतेची गरज लागते का? तसेच ‘हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे’ हे देखील एक सत्य आहे. जो कोणी या भूमीला आपली मातृभूमी मानतो आणि हिंदू संस्कृतीचा आदर करतो, तो हिंदू आहे. जोपर्यंत या भूमीवर हिंदुस्थानी पूर्वजांचा गौरव मानणारा एकही व्यक्ती जिवंत आहे, तोपर्यंत हे हिंदू राष्ट्रच राहील’.
घटनेतील शब्दावर भाष्य संविधानातील बदलांबाबत बोलताना ते म्हणाले की, संसदेने भविष्यात राज्यघटनेत सुधारणा करून तसा शब्द जोडला किंवा नाही जोडला, तरी आम्हाला त्याने फरक पडत नाही. आम्ही हिंदू आहोत आणि आमचे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे, हेच अंतिम सत्य आहे. तसेच, जन्मावर आधारित जातिव्यवस्था हे हिंदुत्वाचे लक्षण नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘संघ मुस्लीमविरोधी नाही’ संघाबद्दल असलेल्या गैरसमजांवर भाष्य करताना भागवत यांनी लोकांना संघाच्या शाखा आणि कार्यालयांना भेट देण्याचे आवाहन केले. ‘संघाबद्दल अनेकदा ‘मुस्लीमविरोधी’ अशी चुकीची प्रतिमा तयार केली जाते. मात्र, संघ केवळ हिंदूंचे संघटन आणि राष्ट्रवादासाठी कार्य करतो. आमचे काम अत्यंत पारदर्शक आहे. ज्यांना शंका आहे त्यांनी स्वतः येऊन आमचे कार्य पाहावे, म्हणजे त्यांचा दृष्टिकोन बदलेल’, असे ते म्हणाले.
अनेकांनी आता हे मान्य केले आहे की संघ कट्टर राष्ट्रवादी आहे, हिंदूंच्या संरक्षणासाठी उभा राहतो, पण तो मुस्लीमविरोधी नाही, असेही त्यांनी नमूद केले.



























































