
दिल्लीहून मुंबईला येणाऱया 335 प्रवाशांचा जीव सुमारे तासभर टांगणीला होता. मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे उजवे इंजिन उड्डाण घेतल्यानंतर अचानक बंद झाले. मात्र दुसऱया इंजिनच्या आधारे विमान सुरक्षितरीत्या परत दिल्ली विमानतळावर उतरविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, बोइंग कंपनीचे 777-300ईआर हे एअर इंडियाचे विमान सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने आकाशात झेपावले. मात्र काही मिनिटांमध्येच विमानाचे एक इंजिन बंद पडले. इंजिनातील ऑईल प्रेशर अचानक शून्य झाले. सुदैवाने हे विमान दोन इंजिन असलेले होते. त्यामुळे दुसऱ्या इंजिनच्या आधारे सुरक्षित लँडिंग करता येते. त्यामुळे विमान लगेच माघारी फिरविले आणि ते 6.52 वाजता उतरले. विमानातील सर्व प्रवाशांना दुसऱया विमानाने मुंबईला पाठविण्यात आले.
दोन इंजिनांचे महत्त्व
या विमानात दोन जेट इंजिन असून ते पंखांच्या खाली बसविण्यात आले आहेत. दोन्ही इंजिन स्वतंत्रपणे कार्यरत असतात. प्रत्येक इंजिनाचा स्वतंत्र इंधन, आईल यंत्रणा आहे. त्यामुळे एका इंजिनातील बिघाड दुसऱया इंजिनाला प्रभावित करत नाही. म्हणूनच एक इंजिन बंद पडले तरीही विमानाचे सुरक्षित लँडिंग करता येते.
घटनेची चौकशी करण्याचे आदेश
एक इंजिन बंद पडण्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. तसेच या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश डीजीसीएला देण्यात आले आहेत.




























































