महापालिकेचा रणसंग्राम, आजपासून उमेदवारी अर्ज

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांसाठी लगबग सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले असून उद्यापासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे 23 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तसेच 25 डिसेंबर आणि 28 डिसेंबर रोजी सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे महापालिकेने कळवले आहे.

31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करून अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 2 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारीला उमेदवारांना निवडणूक चिन्हे दिली जाणार आहेत. निवडणूक लढवणाऱया उमेदवारांची अंतिम यादीही त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे.

पक्ष कार्यालयांमध्ये इच्छुकांची गर्दी

यंदाची मुंबई महापालिका निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठsची मानली जात आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने उमेदवार निवडीमध्ये अत्यंत सावधगिरीची भूमिका घेतली आहे. एकेका वॉर्डात लढण्यासाठी अनेक इच्छुक आहेत; पण जिंकून येण्याची खात्री असलेल्या उमेदवारालाच तिकीट देण्याबाबत प्रत्येक पक्ष विचार करत आहे.