
>> उदय जोशी
‘बीडमध्ये श्वासही घ्यायचा असेल तर तो क्षीरसागरांच्या परवानगीने!’ असे गमतीने म्हटले जायचे. क्षीरसागर नावाच्या वटवृक्षाखाली अनेक राजकीय झुडपे उगवली आणि नामशेष झाली. या वटवृक्षाला कुर्हाडी, करवती लावण्याचा अनेकवेळा प्रयत्न झाला; परंतु त्याची साधी पारंबीही कुणी तोडू शकले नाही. कालचक्राच्या ओघात क्षीरसागर घराण्याच्या पाती विखुरल्या, राजकारणावरची पोलादी पकड सैल झाली आणि हे मातब्बर घराणे जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार झाले.
केशरकाकू क्षीरसागर या काँग्रेसच्या मातब्बर नेत्या. इंदिरा गांधी, शीला दीक्षित यांच्याशी केशरकाकूंचे मैत्रीचे संबंध. क्षीरसागर घराण्याने गांधी घराण्याशी असलेली निष्ठा प्राणपणाने जपली. सरपंच असलेल्या केशरकाकू खासदार झाल्या. पुढे त्यांनी शिक्षण संस्था, साखर कारखान्याच्या माध्यमातून गावागावांत कार्यकर्त्यांचे जाळे विणले. बीड जिल्ह्यातील एकही गाव असे नाही, जिथे क्षीरसागरांचा कार्यकर्ता नाही. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून क्षीरसागर घराण्याने बीड जिल्ह्यात स्वत:चा दबदबा निर्माण केला. क्षीरसागरांच्या राजकारणाला कधी शिवाजीराव पंडित, तर कधी बाबुराव आडसकर यांनी हादरे देण्याचा प्रयत्न केला; परंतु क्षीरसागर घराणे त्याला बधले नाही. केशरकाकूंच्या नंतर त्यांचे मोठे चिरंजीव जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला.
बीडच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचा उदय झाला. त्यांचे धाडसी राजकारण बीडकरांना भावले. परंतु मुंडे यांची क्षीरसागर घराण्याशी असलेली जवळीक बीडकरांपासून लपून राहिली नाही. दोघांनीही राजकारणात एकमेकांना पूरक अशी भूमिका घेतली. गावागावातील कार्यकर्त्यांची फौज, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समित्या अशा सर्वच ठिकाणी क्षीरसागरांचेच प्राबल्य. क्षीरसागरांचे प्रस्थ रोखण्यासाठी त्यांच्या घरातच सुरूंग लावण्यात आला आणि त्यातून संदीप क्षीरसागर यांच्या राजकारणाचा उदय झाला. या फोडाफोडीत क्षीरसागर घराणे स्वत:चे अस्तित्वच गमावून बसले. घरातच राजकीय मतभेद विकोपाला गेले. त्याचा परिणाम चाळीस वर्षांपासून बीड नगर परिषदेवर असलेली क्षीरसागरांची सत्ता लयाला गेली आणि हे मातब्बर घराणे जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार झाले.
४० वर्षांच्या सत्तेला असा लागला सुरूंग
बीड नगरपालिकेवर क्षीरसागर कुटुंबाची ४० वर्षापासूनची एकहाती सत्ता होती. नगरपालिकेत निवडणूक लढवायची की यंदा बिनविरोध काढायची याचा पैâसला क्षीरसागर करत होते. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नगर परिषदेवरची पकड कधीही ढिली पडू दिली नाही. बी फॉर्म देण्याच्या वादातून योगेश क्षीरसागर यांनी ऐनवेळी भाजपशी संगत केली. योगेश क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांच्या आपसातील यादवीने क्षीरसागरांच्या राजकारणाचा र्हास केला. संदीप क्षीरसागर यांच्या अतिआत्मविश्वासाने अजित पवार गटाच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.






























































