
>> सचिन कावडे
मुख्यमंत्र्यांनी दोन सभा घेऊनही केवळ आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या नेभळट धोरणामुळे हिंगोलीत भाजप रसातळाला गेली. हिंगोलीत मिंध्यांच्या दांडगाईपुढे भाजपने अक्षरश: गुडघे टेकले. स्वत:ला कार्यसम्राट म्हणवून घेणार्या आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वावरच या निकालाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व वसमत या तीन नगर परिषदांसाठी नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या तीनही नगर परिषदा ताब्यात घेण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती. पण ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपचे अनेक उमेदवार पळून गेले. काही उमेदवार मिंध्यांनी गळाला लावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांचे उमेदवार पळवू नका, असे बजावूनही मिंध्यांचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत भाजपला ठिकठिकाणी भगदाड पाडले. आमदार बांगर यांच्या दंडेलीसमोर आमदार तान्हाजी मुटकुळे अक्षरश: हतबल झाले होते.
हिंगोलीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नीता बांगर यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली; परंतु हिंगोलीकरांनी फडणवीसांनाही झिडकारून मिंध्यांच्या पदरी मतांचे दान टाकले आणि रेखा बांगर या निवडून आल्या. हिंगोलीत भाजपचे २२ पैकी केवळ पाच उमेदवार निवडून आले. वसमत नगराध्यक्ष पदासाठी भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलला. येथे सुषमा बोड्डेवार यांनी संधी देण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभाही झाली; परंतु उपयोग झाला नाही. वसमतकरांनी अजित पवार गटाच्या सुनीता बाहेती यांना विजयी केले. कळमनुरीत मिंध्यांच्या उमेदवार आश्लेषा चौधरी विजयी झाल्या. येथे आमदार संतोष बांगर यांनी चौधरी यांना निवडून आणण्यासाठी सर्व यंत्रणा हायजॅक केली होती. जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत या तीन नगर परिषदांमध्ये ८४ पैकी भाजपला केवळ ११ जागाच निवडून आणता आल्या. यामुळे भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्याही राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





























































