
इटलीतून हद्दपार करण्यात आलेला विनाशकारी रासायनिक प्रकल्प चिपळुणातील लोटे औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताच महायुती सरकारची अक्षरशः पळापळ झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहा अधिकाऱयांचे पथक मुंबईतून तातडीने लोटे येथे दाखल झाले आहे. दरम्यान, लक्ष्मी
ऑरगॅनिक्स कंपनीने हा प्रकल्प उभारला असून या प्रकल्पामुळे प्रदूषण होणार की नाही, याचा अहवाल एमपीसीबीने कंपनीकडेच मागितल्याची बाब समोर आली आहे. अजब सरकारच्या या गजब कारनाम्यांवर कोकणातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
इटलीमध्ये घातक प्रदूषणामुळे बंद पडलेल्या आणि न्यायालयीन कारवाईला सामोरी गेलेल्या मिटेनी एस.पी.ए. या रासायनिक कंपनीची यंत्रसामग्री भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजच्या विवा लाइफसायन्सेस या उपकंपनीने खरेदी करून लोटे येथे वापरात आणली आहे. याविषयीचा व्हिडीओ व्हायरल झाल तसेच वर्तमानपत्रांमध्ये बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे चिपळूणसह कोकणात खळबळ माजली. लोटे परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणामुळे संवेदनशील मानला जातो. त्यातच पीएफएएससारख्या रसायनांचे उत्पादन झाल्यास वशिष्ठाr नदी, भूगर्भातील पाणी आणि मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती स्थानिकांनी आणि पर्यावरणतज्ञांनी व्यक्त केली. इटलीत प्रदूषणास कारणीभूत ठरलेलीच जुनी यंत्रसामग्री येथे वापरली जात असल्याने या अटींच्या अंमलबजावणीवरही पर्यावरणतज्ञांनी प्रश्न उपस्थित केले.
जूनपासून सुरू आहेत चाचण्या!
गंभीर बाब म्हणजे लोटेतील या कंपनीने जूनपासून चाचण्या सुरू केल्या आहेत. या चाचण्यांमधील टाकाऊ लिक्विड विघटनासाठी तळोजा येथे पाठवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. 4 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चाचण्यांचा अहवाल देण्याची नोटीस दिली होती. तो अहवाल तज्ञ समिती स्थापून त्यांच्याकडे पाठवला जाईल. या समितीकडून खात्रीशीर अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, असे एमपीसीबीचे अधिकारी सांगत आहेत.
कायद्याचे उल्लंघन
लोटे वसाहतीमधून तळोजा येथे वेस्ट केमिकल घेऊन जाणारे वाहतूकदार यांनी याआधी रसायन कशेडी घाटात आणि बोरज धरणात सोडले असल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. कोकणात सीईटीपी आणि घातक कचऱयाचे वाहतूकदार हे नियम आणि कायद्याचे उल्लंघन करत असल्यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. दरम्यान, सर्व वैधानिक प्रक्रिया प्रत्यक्षात पाळल्या जातील याची खात्री एलआयओएल कशी देईल, असा उलट प्रश्न कंपनीचे साईट हेड पाटील यांनी केला.
सहा अधिकाऱयांचे पथक
कंपनी प्रदूषणकारी असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुसऱयांदा लोटे गाठले आहे. मुंबई मुख्यालयातून सहा वरिष्ठ अधिकाऱयांचे एक पथक सोमवारी लोटे येथे कंपनीत दाखल झाले. या पथकाकडून कंपनीची चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
उद्योगमंत्री सामंतांचा बचाव – म्हणे, बंदीचा निर्णय अहवालानंतर उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी यावर बचावात्मक भूमिका घेतली. बंदीचा निर्णय अहवालानंतर घेऊ, असे ते म्हणाले. तिथे चाचणीसाठी फ्लोरीनचे उत्पादन घेण्यात आले. एक टक्क्यापेक्षाही कमी त्याचे प्रमाण होते. तिथून एक टँकर लिक्विड बाहेर पडले हे खरे आहे, पण त्याचा एक थेंबही रस्त्यावर पडलेला नाही. ते तळोजाला नेले व तिथे त्याचे विघटन करण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत तिथे पुन्हा ते लिक्विड तयार झालेले नाही, असा दावा सामंत यांनी केला. कंपनीला 4 नोव्हेंबरला एमपीसीबीने नोटीस बजावली आहे. त्यावर कंपनीकडून अद्याप उत्तर आलेले नाही. मात्र कंपनी प्रदूषणकारी असेल, पर्यावरणाला हानी पोहचवणारी असेल तर त्याला प्रतिबंध करू, असे ते म्हणाले.



























































