लेख – नाताळ ही आमूलाग्र बदलाची सुरुवात

>> श्रीनिवास बेलसरे

आज जगभर धार्मिक उन्माद, युद्धे, दुसऱयाचे हडपण्याची वृत्ती, निर्दय नरसंहार यांचा बोलबाला असताना येशूची शिकवण सगळ्या समस्यांवरचे औषध ठरू शकते, पण त्याच्या जन्माचा आनंद साजरा करताना किती जणांना तो या जगात का आला? त्याचा मुख्य संदेश काय होता? त्याचे शिष्य म्हणून मिरवण्यापूर्वी त्याच्या शिष्यत्वाचे कोणते निकष आपण पूर्ण करतो यावर कुणी विचार करेल? तो झाला तरच त्याच्या आगमनाचा अर्थ आपल्याला समजला असे म्हणता येईल.

आज नाताळ. प्रभू येशूचा जन्मदिवस. प्रभूच्या जन्माला आज 2025 वर्षे झाली तो आनंद साजरा करण्याचा दिवस, पण या दिवसाचे महत्त्व एवढेच आहे का? येशूच्या जन्मापूर्वी सुमारे 700 वर्षांपासून ज्यू धर्माच्या पुस्तकात त्याच्या भावी आगमनाबाबतच्या भविष्यवाण्या लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्याचा उल्लेख मानवजातीचा उद्धारक (मसिहा) असा आहे.

प्रभू येशूंच्या बऱयाच आधी जन्मलेल्या प्रेषित मोशेने ज्यू लोकांची ‘फारो’ या इजिप्तमधल्या जुलुमी राजापासून सुटका केली. ती त्यांना भौतिक गुलामगिरीपासून मिळालेली मुक्ती होती. येशूने दिलेली मुक्ती मात्र खूप मूलभूत, व्यापक होती. जुने नकारात्मक विचार, रूढी, अंधश्रद्धा यांपासून सुटका देणारा येशू ईशपुत्र होता, खूप वेगळ्या अर्थाने मानवजातीचा मुक्तिदाता होता.

शेकडो वर्षे हजारो कायदे करून, तुरुंग उभारूनही जग फार बदलले असे दिसत नाही. माणसातला स्वार्थीपणा, क्रूरपणा कोणत्याही शिक्षेच्या भीतीने मुळीच कमी झाला नाही. त्यावर एक अगदी क्रांतिकारी
विचार येशूने दिला. त्यातून अनेकांच्या भूमिकेत बदल झाले. गांधीजींनी तर त्या विचाराने इंग्रजी साम्राज्याला धक्का दिला. पुढे तेच नेल्सन मंडेलांनीही आफ्रिकेत केले.

येशूच्या काळातही समाजावर जुन्या विचारांचा, रूढींचा प्रचंड प्रभाव होता. मोशेच्या नियमशास्त्रात प्रत्येक गुह्यासाठी शिक्षा, प्रायश्चित्त ठरवून दिलेले होते. समाजाच्या नियंत्रणासाठी त्यांचा उपयोगही झाला. मात्र येशूचे विचार अगदीच वेगळे होते. तो म्हणाला, ‘‘आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर आणि आपल्या शत्रूचा द्वेष कर असे तुम्हाला शिकवले गेले आहे, पण तुम्ही ईश्वराचे पुत्र आहात. तो सज्जन आणि दुर्जनावर सारखेच प्रेम करतो. दोघांच्याही शेतात सारखाच पाऊस पाडतो. तुम्हीही त्याच्यासारखे समदृष्टी व्हा, पूर्ण व्हा. क्षमा करायला शिका. मित्राइतकेच प्रेम शत्रूवरही करा.’’ ही शिकवण म्हणजे तत्कालीन अध्यात्मातील ‘क्वांटम जम्प’, हनुमान उडी होती!

त्या काळी माणूस आजच्या इतका क्रूर आणि कुटील झालेला नव्हता. प्रभूचा माणसाच्या हृदयपरिवर्तनावर विश्वास होता. एखादी व्यक्ती तिच्याशी वाईट वागल्यावरही आपल्याशी चांगले वागते हे पाहिल्यावर माणसात बदल घडेल अशी त्याची धारणा होती. त्याला जग तलवारीच्या जोरावर नव्हे, तर प्रेमाने जिंकायचे होते. आज निरपेक्षपणे जगभर मानवसेवा करणारे रेड क्रॉसचे लोक, रुग्णसेवा करणारे बाबा आमटे, मदर तेरेसांसारखे समाजसेवक त्याचीच तर शिकवण जगले.

एका वारांगनेला धरून लोकांनी येशूपुढे आणले आणि तिला मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे दगडमाराने देहदंड देण्याची मागणी केली. हा शास्त्री, पंडितांनी लावलेला सापळा होता. कारण येशूची क्षमेची शिकवण मोशेच्या कायद्याचा भंग करत होती. येशू ते ओळखून म्हणाला, “शिक्षा अवश्य करा. फक्त तिला पहिला दगड त्याने मारावा ज्याने मोशेच्या नियमानुसार आजवर कोणतेच पाप केले नाही.’’ एकेका हातातून दगड गळून पडले, लोक निघून गेले. शेवटी प्रभू तिला म्हणाला, ‘‘जा मुली, पुन्हा पाप करून नकोस.’’
येशूची शिकवण अशी सामान्य लोकांना पटणारी होती. त्यामुळे पापासाठी मंदिरात प्रायश्चित्त म्हणून दानार्पण, पशुबळी देण्याची पद्धत मागे पडू लागली. शास्त्री-पंडितांचे हितसंबंध बिघडले. त्यांनी येशूला ठार मारण्याचा कट रचला. ईशनिंदेचा खोटा खटला चालवून त्याला सुळावर दिले.

त्या बलिदानाच्या आदल्या दिवशी सायंकाळच्या जेवणापूर्वी त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. एकजण म्हणाला, ‘‘गुरुजी, तुम्ही आमचे पाय धुणे योग्य नाही.’’ त्यावर येशू म्हणाला, ‘‘मी जे उदाहरण घालून देतो आहे त्याचे तुम्हीही पालन करा. एकमेकांवर प्रेम करा, नम्रपणे एकमेकांची सेवा करा. तरच लोक ओळखतील की, तुम्ही ‘माझे’ शिष्य आहात.’’ आज येशूची ही कसोटी किती जण पूर्ण करू शकतील?

शेवटी जेव्हा त्याला क्रुसावर चढवून ठार केले त्या वेळीही तो आपली शिकवण स्वतः जगला. मरणाला सामोरे जाताना त्याला चिंता कुणाची होती? त्याने देवाकडे प्रार्थना कुणासाठी केली? मृत्यूपूर्वीचे त्याचे शब्द होते, ‘‘देवा यांना क्षमा कर. ते काय करताहेत ते त्यांना कळत नाही.’’ संत तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे त्याने ‘आधी केले मग सांगितले’. शत्रूवर केवळ प्रेमच केले असे नाही, तर संभाव्य ईश्वरी शिक्षेपासून स्वतःच्या मारेकऱयांनाही अभय दिले.

आज जगभर धार्मिक उन्माद, युद्धे, दुसऱयाचे हडपण्याची वृत्ती, निर्दय नरसंहार यांचा बोलबाला असताना येशूची शिकवण सगळ्या समस्यांवरचे औषध होऊ ठरते, पण त्याच्या जन्माचा आनंद साजरा करताना किती जणांना तो या जगात का आला? त्याचा मुख्य संदेश काय होता? त्याचे शिष्य म्हणून मिरवण्यापूर्वी त्याच्या शिष्यत्वाचे कोणते निकष आपण पूर्ण करतो यावर कुणी विचार करेल? तो झाला तरच त्याच्या आगमनाचा अर्थ आपल्याला समजला असे म्हणता येईल.