एसटीच्या 48 बसस्थानकांवर महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक

बेस्ट उपक्रमाने, एसटी महामंडळाने महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता खात्यामार्फत मुंबईसह राज्यभरातील एसटीच्या 48 बसस्थानकांवर महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बसवाहतुकीच्या वेळेत महिला सुरक्षा रक्षक बस स्थानक परिसरात बंदोबस्त देत आहेत. ते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर करडी नजर ठेवण्याबरोबरच संकटकाळात महिलांना मदत पुरवत आहेत.

यापूर्वी बसस्थानकांच्या परिसरात महिला प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱया विविध घटना घडल्या. तशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी एसटी महामंडळाने ठोस पावले उचलली आहेत. महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती हे त्यापैकी एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. मुंबईसह राज्यातील 48 बसस्थानकांवर प्रत्येकी दोन असे एकूण 96 महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांनी जानेवारी ते सप्टेंबर 2025 या कालावधीत विशेष कामगिरी करुन महिला सुरक्षेकामी योगदान दिले. बसस्थानकांवर पाकीटमार, चोरी, महिला छेडछाड, घर सोडून आलेल्या महिलांना मदत, मनोरुग्नांना मदत अशा 706 प्रकरणांमध्ये सुरक्षा रक्षकांनी जबाबदारीने काम केले. त्यापैकी 30 प्रकरणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे नोंद झाले. 182 प्रकरणांमध्ये महिला आणि विद्यार्थिनींच्या छेडछाडीसारख्या गंभीर घटना घडल्या होत्या.