
गोरेगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱया दोघा महिलांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. दोघींनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
गोरेगाव येथे गोयल ऍण्ड सन्स इन्फ्रा एलएलपी नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी मुलाच्या लग्नानिमित्त 14 नोव्हेंबरच्या रात्री आंबोलीतल्या एका हॉटेलात पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीनंतर त्यांचा मुलगा हा हॉटेलच्या लिफ्टने खाली उतरत असताना एक महिला लिफ्टमध्ये शिरली व लिफ्टमध्ये लेझर लाईटवरून त्या महिलेने भांडण उकरून काढले. त्यावेळी लिफ्टमध्येच हाणामारीदेखील झाली. बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर खोटे आरोप करीत या महिलेने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली.
गुन्हा दाखल होताच हेमलता पाटकर (39) आणि अमरिना (33) असे नाव सांगणाऱया दोघींनी बांधकाम व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मुलावर कारवाई होऊ द्यायची नसेल तर आम्ही तक्रार मागे घेतो, पण मोबदल्यात दहा कोटी रुपये द्या अशी खंडणीची मागणी केली. तडजोडीनंतर साडेपाच कोटी देण्याचे ठरले. बांधकाम व्यावसायिकाने याप्रकरणी गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यानुसार लोअर परळ येथे सापळा रचून खंडणीचा पहिला दीड कोटी रुपयांचा हप्ता घेताना दोघींना रंगेहाथ पकडण्यात आले.




























































