
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहन ऍग्रीगेटर्स मार्गदर्शक तत्त्वे, 2025 मध्ये सुधारणा केली आहे. या सुधारणामुळे उबर, ओला आणि रॅपिडोसारख्या ऍग्रीगेटर प्लॅटफॉर्मला प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी प्रवाशांकडून टीप मागण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोणतीही ऐच्छिक टीप देण्याची सुविधा प्रवासाच्या पूर्ततेनंतरच प्रवाशांना दिसली पाहिजे आणि ती बुकिंगच्या वेळी उपलब्ध नसावी. राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना या सुधारणांची त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्राहकांच्या तक्रारीनंतर निर्णय केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने मे 2025 मध्ये ‘ऍडव्हान्स टीप’ या फीचरला ‘अन्यायकारक व्यापार पद्धत’ म्हणून घोषित केले होते. या फीचरमुळे जिथे केवळ जास्त पैसे देण्यास इच्छुक असलेले लोकच कॅब सुरक्षित करू शकत होते, अशी तक्रार ग्राहकांनी केली होती. ऍग्रीगेटरने कोणतीही कपात न करता टीपची संपूर्ण रक्कम चालकाला जमा करणे बंधनकारक आहे.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कलम 15.6 जोडले आहे. या कलमानुसार, ऍप्सनी महिला प्रवाशांना महिला चालकांना निवडण्याचा पर्याय देणे अनिवार्य आहे, अर्थात हा पर्याय उपलब्धतेनुसार असेल. या निर्णयामुळे ऍग्रीगेटर्सना महिला चालकांना मोठय़ा प्रमाणावर कामावर घेण्याची गरज भासेल. कारण सध्या गिग वर्कफोर्समध्ये महिला चालकांचे प्रमाण 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे.




























































