पीएसआय परीक्षा वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी पवार मैदानात, शेकडो परीक्षार्थी उमेदवारांचे साकडे

पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या भरतीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विलंब झाला आहे. परिणामी वयोमर्यादेच्या तारखेचा अनेक उमेदवारांना बसला आहे. त्यामुळे परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी काही उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे साकडे घातले आहे. त्यावर विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी शरद पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पण भरतीला विलंब झाला आहे. यामध्ये अनेक उमेदवारांचे वय वाढल्याने हे उमेदवार परीक्षेला बसू शकत नाही. त्यामुळे वयोमर्यादा वाढवण्याची मागणी उमेदवारांनी सरकारकडे केली आहे.

गृह विभागाच्या दोन वेगवेगळय़ा पदांमध्ये वयोमर्यादेमधील तफावतीकडे लक्ष वेधले आहे. पोलीस शिपाई भरतीसाठीची वयोमर्यादा 28 वरून 35 वर वाढवली आहे, पण याच पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा वाढवण्यात आलेली नाही. या पदासाठी एक वर्षाची वयोमर्यादा वाढवण्याची उमेदवारांची मागणी आहे.

मुळात पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध होण्यास सात महिन्यांचा विलंब झाला आहे. या भरतीसाठी वयोमर्यादेची तारीख 1 नोव्हेंबर 2025 निश्चित केली होती. यामध्ये अनेकांची संधी हिरावली गेली. त्यामुळे वयोमर्यादेची तारीख 1 जानेवारी 2025 ही निश्चित करावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. या मागणीसाठी काही तरुणींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घातले आहे. या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात उतरले.

या मागणीसंदर्भात शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. उमेदवारांची मागणी रास्त असून राज्य सरकारने याचा सकारात्मक भूमिकेतून विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.