
सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे खायला घालणाऱया दादरच्या व्यापाऱयाला वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने दणका दिला. सरकारी आदेशाचे उल्लंघन तसेच सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने व्यापाऱयाला दोषी ठरवले आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.
कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ देण्यावर उच्च न्यायालयाने जुलै महिन्यात बंदी घातली. त्या बंदीनंतर कबुतरांना दाणे खायला दिल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्याची ही पहिली वेळ आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. यू. मिसाळ यांनी व्यापारी नितीन शेठ याला भारतीय न्याय संहितेच्या कलम 223(ब) आणि 271 अन्वये दोषी ठरवले. शेठविरोधात माहीम पोलिसांनी 1 ऑगस्टला गुन्हा दाखल केला होता. आरोपीचे कृत्य मानवी जीवन, आरोग्य आणि सुरक्षेला धोका निर्माण करणारे आहे, असे निरीक्षण न्यायदंडाधिकाऱयांनी निर्णय देताना नोंदवले.





























































