
बांगलादेशातील अराजकी परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रेहमान हे 17 वर्षांनंतर पुन्हा बांगलादेशात परतले आहेत. बांगलादेश नॅशनल पार्टीचे (बीएनपी) कार्यकारी अध्यक्ष असलेल्या तारिक यांचे लाखो पाठीराख्यांनी मायदेशात जोरदार स्वागत केले. तारिक रेहमान यांच्याकडे बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान म्हणून पाहिले जात आहे.
मागील वर्षी झालेल्या ‘जेन झी’ आंदोलनानंतर बांगलादेशात सत्तांतर झाले. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी जिवाच्या भीतीने पलायन केले. त्यानंतर अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली तिथे हंगामी सरकार कार्यरत आहे. या सरकारने फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. झियांचा बीएनपी हा पक्ष पुन्हा सत्तेवर येईल अशी चिन्हे आहेत. मात्र खालिदा झिया या आजारी असल्याने पक्ष नेतृत्वहीन झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर तारिक रेहमान बांगलादेशात परतले आहेत.
बांगलादेशात परतल्यानंतर तारिक रेहमान यांनी आजारी आईची भेट घेतली. तसेच, स्वागतासाठी आलेल्या लाखो समर्थकांसमोर त्यांनी भाषणही केले. बांगलादेशला आपण 1971 आणि 2024 असे दोन वेळा स्वातंत्र्य मिळवून दिले. देशात शांतता आणि स्थैर्याला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
17 वर्षे कुठे होते रेहमान?
तारिक यांच्यावर बांगलादेशात मनी लॉण्ड्रिंग व शेख हसीना यांच्या हत्येच्या कटासह अनेक गुन्हे दाखल होते. त्यामुळे 2008 पासून ते लंडनमध्ये वास्तव्यास होते. शेख हसीना यांच्या गच्छंतीनंतर त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले. त्यामुळे त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला होता.





























































