हा कसला न्याय आणि ही कसली माणुसकी? सेंगरच्या जामिनावर आदित्य ठाकरे यांचा संताप

उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर याला मिळालेला जामीन आणि न्याय मागणाऱया पीडित कुटुंबाच्या होत असलेल्या अवहेलनेवरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘हा कसला न्याय आणि ही कसली माणुसकी,’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ‘एक्स’ पोस्ट करत भाजपवर हल्ला केला. ‘सेंगरच्या शिक्षेला स्थगिती देऊन त्याला जामीन देण्याचा निर्णय आणि बलात्काऱयाच्या विरोधात आंदोलन करणाऱया पीडितेशी आणि तिच्या आईशी पोलिसांनी केलेले गैरवर्तन हे सगळेच धक्कादायक आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हणाले.

निवडणुकांसाठी भाजप ‘लाडकी बहीण’ व इतर योजनांच्या घोषणा करतो; मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. उन्नाव पीडितेसोबत जे घडले, ती देशातील खरी परिस्थिती आहे. जगभरातील लोकांनी हे पाहिले असेल, त्यावर ते व्यक्त होतीलही; पण हिंदुस्थानात याविषयी बोलणाऱयांना व आंदोलन करणाऱयांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. मंत्री आंदोलनांची खिल्ली उडवत आहेत,’ अशी चिंता आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

…तोपर्यंत बोलत राहावे लागेल!

‘ज्याला कठोर शिक्षा व्हायला हवी होती, त्या बलात्काऱयाला जामीन मिळतो? हा न्याय आहे का? ही आपली समज आहे? हे माणुसकीला तरी धरून आहे का? अशी विचारणा करतानाच, जोपर्यंत दोषीला कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत निषेध थांबवता येणार नाही. प्रत्येकाला याबद्दल बोलत राहावे लागेल,’ असेही ते म्हणाले.