
उदयपूरमध्ये आयटी कंपनीच्या मॅनेजरवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कंपनीच्या सीईओसह तीन आरोपींना अटक केली आहे. पीडिता शुद्धीत आल्यानंतर तिचे कानातले, मोजे आणि अंतर्वस्त्रे गायब होती. त्यानंतर तिच्यासोबत काहीतरी विचित्र घडल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता डॅशकॅम, मेडिकल रिपोर्ट आणि जबाबाच्या आधारावर पोलीस तपास करत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कपंनीच्या सीईओचा 20 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने राजस्थानमधील शोभागपुरा येथील एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती. पीडित तरुणी रात्री 9 च्या सुमारास पार्टिला पोहोचली. ही पार्टी मध्यरात्री 1.30 वाजता संपली. या दरम्यान पीडितेला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ती घरी परतण्यासाठी निघाली. काहीजण तिला घरी सोडण्यासाठी जाणार होते. दरम्यान, कंपनीच्या एका महिला कार्यकारी प्रमुखाने आफ्टर पार्टी दिली. त्यानंतर पीडितेला बळजबरीने एका कारमध्ये बसवण्यात आले. जिथे महिला कार्यकारी प्रमुखचा पती आणि कंपनीचा सीईओ आधीच त्या कारमध्ये होते. तिला सांगण्यात आले की, तिला घरी सोडण्यात येईल. वाटेत गाडी थांबवून आरोपींनी धुम्रपानाचे साहित्य घेतले. त्यानंतर पीडितेला गाडीत धुम्रपान करायला दिले. त्यानंतर पुढे तिच्यासोबत काय झाले ते तिला काहीच आठवत नव्हते.
ज्यावेळी पीडितेला थोडी शुद्ध आली, त्यावेळी आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडल्याची तिला जाणीव झाली. त्यानंतर तिने विरोध करत गाडी थांबविण्यास सांगितली. मात्र, कोणीच काही ऐकले नाही. गाडीत असलेल्या तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिच्यावर पावणे दोन ते सकाळी 5 वाजेच्या दरम्यान बलात्कार करण्यात आला. सकाळी पीडित तरुणीला तिच्याघरासमोर सोडण्यात आले. ती कशीबशी घरी पोहोचली. मात्र, पूर्णपणे शुद्धीत आल्यानंतर तिच्या गुप्तांगावर जखमा होत्या. अंग दुखत होते. त्यावेळी तिच्या कानातले, मोजे आणि अंतरवर्स्त्र गायब असल्याचे लक्षात आले.
त्यानंतर पीडितेने नेमके काय झाले ते आठवण्याचा प्रयत्न केला. तिच्या लक्षात आले की ती ज्या कारमध्ये रात्रभर होती, त्यामध्ये डॅशकॅम लावलेला होता. तिला त्या कारमध्ये लावलेले डॅशकॅम ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्ड मिळाले. त्यात तिला आरोपींचे बोलणे आणि आवाज ऐकू आले. ज्यात तिला तिच्यावर बलात्कार झाल्याचे लक्षात आले. तिने तत्काळ याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. वैद्यकीय तपासात तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आयटी कंपनीचा सीईओ जयेश, सहआरोपी गौरव आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे.

























































