
खोपोलीतील शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची गुरुवारी सकाळी निर्घृण हत्या झाली होती. मुलीला शाळेत सोडायला गेलेले मंगेश काळोखे यांना मारेकऱ्यांनी भररस्त्यात घेऊन त्यांच्यावर चॉपर आणि तलवारीचे वार केले. यात काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आता दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी नागोठणे येथून रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे आठ पथक या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?
गुरुवारी सकाळी मानसी यांचे पती मंगेश हे मुलीला शाळेत सोडून साईबाबानगर येथे मोटारसायकलने जात असता मारेकऱ्यांनी त्यांच्या मोटारसायकलला बिहारी गावाजवळ धडक दिली. घातपात होणार असल्याचे दिसताच मंगेश हे जीवाच्या आकांताने पळत सुटले. मात्र मारेकऱ्यांनी त्यांच्यावर तलवारी आणि चॉपरने एकापाठोपाठ वार केले. त्यामुळे मंगेश काळोखे हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले.
राष्ट्रवादीच्या जिल्ह्याध्यक्षावर गुन्हा
या घटनेनंतर शेकडो महिलांनी खोपोली पोलीस ठाण्यावर धडक दिली. जोपर्यंत मारेकऱ्यांना पकडत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला. याप्रकरणी काळोखे कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह प्रवक्ते भरत भगत यांच्यावर खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



























































