
पंतप्रधान नरेँर मोदी यांना गांधी आडनावाशी चीड आहे, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत. मनरेगाचे नाव बदलून VB G RAM G असे करण्यात आले असून याला काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. याच विरोधात आज एका आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत की, “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव मनरेगामधून काढून टाकणे हा त्यांचा अपमान आहे. कारण सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी मनरेगा कायदा बनवला. आम्ही त्यांना अधिकार दिला. तुम्ही नाव बदलत आहात. हे फक्त गांधी कुटुंबाचेच नाही. त्यांना महात्मा गांधींचे नावही आवडत नाही. सरकारला गांधी आडनावाची चीड आहे.”
याच पत्रकार परिषदेत बोलताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, “मनरेगाचे नाव बदलण्याचा निर्णय कॅबिनेट आणि राज्य सरकारांना विचार न करता थेट घेण्यात आला असून सध्या “मोदी वन मॅन शो” सुरू आहे आणि मोदी जे करायचे ठरवतात तेच करतात. या निर्णयाचा फायदा दोन–तीन अब्जाधीशांना होत असून त्याचा तोटा ग्रामीण भागाला सोसावा लागत आहे.”
राहुल गांधी म्हणाले, “मनरेगा ही केवळ योजना नव्हती तर हक्कांवर आधारित संकल्पना होती, ज्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांना किमान मजुरीची हमी मिळत होती. त्यामुळे मनरेगा बंद करणे म्हणजे हक्कांवर आधारित संकल्पनेवर थेट आघात आहे. हा पैसा राज्यांकडून काढून केंद्राकडे खेचला जात आहे, सत्ता आणि आर्थिक अधिकारांचे संकुचन होत आहे आणि हा निर्णय थेट पंतप्रधान कार्यालयातून घेण्यात आलेला आहे.”





























































