साखरे-फुलारी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर, विजेच्या धक्क्याने चौघांचा जागीच मृत्यू

तालुक्यातील केशेगाव शिवारात घडलेल्या भीषण दुर्घटनेत विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू झालाय. ही दुर्घटना शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात आलंय. या दुर्घटनेमुळे फुलारी आणि साखरे परिवारावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला असून केशेगांवावर शोककळा पसरलीय.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, केशेगांव येथील रहिवासी नागनाथ साखरे यांच्या शेतातील विंधन विहिरीतील पंप काढण्यासाठी काशीम कोंडुलाल फुलारी यांची कप्पी लावण्यात आली होती. त्या बोअरमधील पाईप काढण्याचं काम सुरू असताना, कप्पी जवळच्या विद्युत प्रवाहित इलेक्ट्रीक तारांवर पडल्याने झालेल्या दुर्घटनेत चौघांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला.

मृतामध्ये कप्पीचालक काशीम कोंडुलाल फुलारी (वय – अंदाजे 50 वर्षे), त्यांचा रतन काशीम फुलारी (वय – 18 वर्षे), शेतकरी नागनाथ साखरे (वय- अंदाजे 55 वर्षे) आणि रामेश्वर नागनाथ साखरे (वय – अंदाजे 26 वर्ष, सर्व रा. केशेगांव, तालुका तुळजापूर) यांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलंय.

या दुर्घटनेत विद्युत प्रवाहित इलेक्ट्रीक तारांवर पडल्याने उडालेल्या ठिणग्यांच्या तीव्रतेने जमीनीवरचं गवतही जळाल्याचं दिसतंय. या दुर्घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या घटनास्थळास भेट दिली असून पुढील सोपस्कारस सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आलंय.