
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 128 जागांपैकी 125 जागांवर नगरसेवक निवडून येतील, असा दावा भाजपचे निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांनी केल्यानंतर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी जगतापांना उत्तर दिले आहे. अजित पवार गटातील माजी नगरसेवकांना पक्षात घेताना ईव्हीएम मशीनमध्ये दोन ते अडीच हजार मते आपोआप मिळतील, असे भाजपकडून सांगितले जात असल्याचा खळबळजनक आरोप बहल यांनी शनिवारी केला. राज्यातील सत्तेमधील अजितदादा गटाकडून ईव्हीएमबाबत गंभीर आरोप केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. बहल यांच्या आरोपामुळे शहरातील राजकारण ऐन थंडीत तापण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील सत्तेत सहभागी असलेले भाजप आणि अजित पवार गट पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढत आहे. या दोन्ही पक्षांमध्ये माजी नगरसेवकांच्या पह्डापह्डीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपने शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजपचे निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांनी 128 पैकी 125 नगरसेवक भाजपचे निवडून येतील, असा दावा केला. या दाव्यानंतर अजित पवार गटाने जोरदार पलटवार केला आहे.
शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, भाजपचे विधानसभेचे दोन आणि विधान परिषदेचे दोन असे चार आमदार आहेत. प्रत्येक आमदार 25 नगरसेवक निवडून आणेल असे भाजप नेतृत्वाला वाटत असेल. त्यामुळे शंभर पारचा भाजपकडून नारा दिला जातो. त्याला आमची हरकत नसून शुभेच्छा आहेत. भाजपने 128पैकी 125 नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिला आहे. भाजपने मतदान यंत्र सेट केले आहे का, असे विचारले असता योगेश बहल म्हणाले, भाजपने ईव्हीएम सेट केले आहे का हे त्यांनाच माहिती आहे. मात्र पक्षात घेणाऱया माजी नगरसेवकांना मतदान यंत्रामध्ये दोन ते अडीच हजार मते आपोआप मिळतील, असा आरोप बहल यांनी केला आहे. तुम्ही आमच्याकडे या, बाकीची सर्व मदत करण्याचे आश्वासन भाजप नेत्यांकडून दिले जात असल्याचेही बहल म्हणाले.





























































