
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या झालेल्या बैठकीत शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि आमदार विजय शिवतारे यांच्यात खडाजंगी झाली. तुझा आणि पुण्याचा संबंध काय, असा सवाल भानगिरे यांनी शिवतारे यांना केला. या वादानंतर भानगिरे बैठक सोडून बाहेर पडले. या घटनेमुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.
शिंदे गटाच्या नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे आणि शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी शिंदे गट कमर्शियल केला आहे. कमर्शियल पद्धतीने तिकीट वाटप केले जात असल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी डॉ. गोऱहे यांच्या घराबाहेर आंदोलन करून जाब विचारला होता. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात नीलम गोऱहे, आमदार विजय शिवतारे आणि शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपावरूनही खडाजंगी उडाली.
बैठकीत भानगिरे आणि शिवतारे यांच्यामध्ये जागावाटपावरून थेट हमरी-तुमरी झाल्याचे पाहायला मिळाले. तुझा आणि पुण्याचा काय संबंध, असे म्हणत भानगिरे यांनी शिवतारे यांना धारेवर धरल्याची चर्चा आहे. काम करणारे कार्यकर्ते सोडून शिवतारे मर्जीतील माणसांना उमेदवारी देण्यासाठी जोर लावत आहेत, असा आरोप भानगिरे यांनी केला आहे.
भाजप आणि शिंदे गटात जागावाटपावरून धुसफुस
पुण्यात सुरुवातीला मिंधे आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं, पण भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नाही म्हणून नीलम गोऱहे यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुण्यात भाजप आणि शिंदे गटात जागावाटपावरून प्रचंड धुसफुस आहे. 35 जागा मागूनही भाजपने शिंदे गटाला फक्त 16 जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. शिंदे गटाचे काही ठरावीक लोक मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता.
























































