
काही खेळाडू धावा करतात, काही विक्रम रचतात. पण काही मोजकेच खेळाडू काळ बदलतात. विराट कोहली त्यातलाच एक. म्हणूनच नवज्योतसिंग सिद्धू यांच्या शब्दांतून उमटलेले विराटसाठीचे भावनिक आवाहन थेट काळजाला भिडते. तो केवळ खेळाडू नाही, तो एक काळ आहे, असे सांगत सिद्धूंनी विराटने पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये परतावे, पुन्हा पांढऱ्या जर्सीत मैदानात उतरावे, अशी आर्त हाक दिली आहे.
सिद्धूंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर केलेल्या भावनिक पोस्टमध्ये विराटच्या फिटनेसची, त्याच्या जिद्दीची आणि क्रिकेटसाठी असलेल्या अमर्याद भुकेची मुक्तकंठाने स्तुती केली. ‘पिढीत एकदाच जन्माला येणारा खेळाडू’ असे वर्णन करत त्यांनी सांगितले की, विराटच्या उपस्थितीने हिंदुस्थानच्या कसोटी क्रिकेटचा आत्मविश्वासच बदलला. त्याची आक्रमकता, त्याचे नेतृत्व आणि स्वतःला झोकून देण्याची वृत्ती आजही अनेक तरुण क्रिकेटपटूंना दिशा देते.
‘माझी एकच इच्छा पूर्ण व्हावी, ती म्हणजे विराट पुन्हा पांढऱ्या जर्सीत मैदानात उतरावा,’ असे म्हणताना सिद्धूंच्या शब्दांत केवळ क्रिकेट नव्हे, तर भावना होत्या. कोटय़वधी चाहते तो क्षण अनुभवायला आतूर असल्याचे नमूद केले. या वर्षी विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दीर्घ आणि ताणतणावपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीनंतर कामाचा ताण आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटला अधिक काळ देण्यासाठी हा निर्णय घेतला गेला. तरीही त्याच्या कसोटी कारकीर्दीची छाया आजही हिंदुस्थानच्या संघसंस्कृतीवर आहे.
परदेशी मैदानांवरील विजय, न झुकणारी मानसिकता आणि विजयाची भूक-विराटने हिंदुस्थानच्या कसोटी क्रिकेटला नवी ओळख दिली. म्हणूनच सिद्धूसारख्या माजी खेळाडूसाठी आणि चाहत्यांसाठी विराटची कसोटीतली पुनरागमनाची शक्यता ही केवळ बातमी नाही, तर आठवणींचा ओलावा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विराटने केलेल्या दमदार फलंदाजीनंतर त्याचा हा जोश कसोटी क्रिकेटमध्ये ढासळत चाललेल्या हिंदुस्थानी संघाला पुन्हा उभारी देऊ शकतो. अशी सर्वांचीच भावना आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंप्रमाणे कोटय़वधी चाहतेही त्याची वाट पाहत आहेत.
बीसीसीआय मन वळवू शकते
विराट कोहलीने वर्षाच्या प्रारंभीच तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता त्याला पुन्हा पांढऱया जर्सीत पाहायचे असेल तर खुद्द बीसीसीआयने पुढाकार घेऊन विराटचे मन वळवले तर तो पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये परतू शकतो, असा विश्वास विराटच्या चाहत्यांना आहे. त्यामुळे हिंदुस्थानी संघाच्या हितासाठी बीसीसीआय पुढाकार घेतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुनरागमनाचा विषय टाळला होता…
आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत जोरदार खेळ केल्यानंतर विराटला कसोटी पुनरागमनाबाबत छेडले असता त्याने आता आपण फक्त वन डे क्रिकेटवर लक्ष केंद्रित केल्याचे सांगत कसोटीत पुनरागमनाचा विषय टाळला होता. मात्र मालिकेत 135, 102 आणि नाबाद 65 धावांच्या खेळ्या केल्यानंतर विराटच्या पुनरागमनाचा विषय अधिकच भावनिक होत चालला आहे आणि संघाला त्याची गरजही आहे.




























































