कंपनीच्या पैशांचा अपहार करणाऱ्याला अटक

एका खासगी ट्रव्हल्स कंपनीच्या 40 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी एका कर्मचाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरी येथे एका खासगी कंपनीचे कार्यालय असून तक्रारदार हे मॅनेजर म्हणून काम करतात. त्या कंपनीत अटक आरोपी हा काम करत होता. फेब्रुवारी 2024 पासून तो अचानक कामावर यायचा बंद झाला. नोव्हेंबर 2023 पासून कंपनीने ग्राहक कंपनीकडून काही रक्कम बाकी येणे असल्याने त्याची तपासणी सुरू केली. तेव्हा त्यांना एका कंपनीकडून सहा लाखांचे पेमेंट बाकी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कंपनीने त्या संबंधित कंपनीशी संपर्क केला. तेव्हा त्या कंपनीने पैसे दिल्याचे पुरावे सादर केले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर अटक आरोपीने त्याच्या पदाचा गैरवापर करून पैशाचा अपहार केल्याचे लक्षात आले.