‘धुरंधर’चे यश अक्षय खन्नाच्या डोक्यात गेलंय, एकट्याच्या जीवावर 50 कोटी रुपयेही कमवू शकणार नाही! वाचा असं कोण म्हणालं?

‘धुरंधर’ चित्रपटात रहमान डकेतच्या भूमिकेमुळे अक्षय खन्ना चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. परंतु दृश्यम 3 या चित्रपटामधून मात्र त्याची गच्छंती झालेली आहे. अक्षय खन्ना आता अजय देवगण अभिनीत ‘दृश्यम 3’ चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार नाही. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कुमार मंगत पाठक यांनी सांगितले की, शूटिंग सुरू होण्याच्या फक्त 10 दिवस आधी अक्षय खन्नाने चित्रपट सोडला. यामुळे त्यांना खूप मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. ते म्हणाले, ‘मी त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्याच्या वागण्यामुळे माझे नुकसान झाले आहे.’

धुरंधरच्या यशानंतर अक्षय खन्नाचा भाव वधारला, मानधनाच्या वादानंतर ‘दृश्यम 3’ कडे वळवली पाठ

निर्मात्याने स्पष्टपणे सांगितले की, ‘धुरंधर’च्या यशासाठी केवळ अक्षय खन्ना कारणीभूत नाही. तर हा चित्रपट प्रत्यक्षात रणवीर सिंगचा आहे. अक्षय खन्ना त्याचे श्रेय एकटे घेऊ शकत नाही. कुमार मंगत यांनी असाही आरोप केला की जेव्हा त्यांनी अक्षयसोबत “सेक्शन ३७५” मध्ये काम केले तेव्हा त्यांचा दृष्टिकोनही प्रतिकूल होता. त्यांनी सांगितले की सेटवर अक्षयचे वागणे नीट नसायचे, मुख्य म्हणजे तो अव्यावसायिक होता.

निर्मात्याने असेही म्हटले की, अक्षय खन्नाने एकट्याने एखादा चित्रपट केला तर तो हिंदुस्थानात 50 कोटी रुपयेही कमवू शकणार नाही. त्यांनी सांगितले की दृश्यम हा चित्रपट अजय देवगणमुळे सर्वांच्या स्मरणात आहे इतर कुठल्याही अभिनेत्यामुळे नाही.

“दृश्यम ३” भोवती वाद निर्माण होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे अक्षय खन्ना चित्रपटात विग घालू इच्छित होता, जो दिग्दर्शक आणि टीमने कथेसाठी आणि सातत्यतेसाठी अयोग्य मानला. त्यानंतर अक्षयने अचानक चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या जागी जयदीप अहलावतला “दृश्यम ३” मध्ये कास्ट करण्यात आले आहे. कुमार मंगत म्हणाले की त्यांना अक्षयपेक्षा चांगला अभिनेता आणि चांगला माणूस सापडला आहे.