
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार आहेत. दोन्ही पक्ष एकत्रित येऊन या शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची घोषणा रविवारी तळवडे येथे केली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ तळवडे येथे फोडला. यावेळी त्यांनी शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे घोषित केले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब झाले. यावेळी भाजपच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर पवार यांनी तोफ डागली. ते म्हणाले, २०१७पासून महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. अनेक कामांमध्ये रिंग केली जाते. ठरावीक लोकांनाच डोळ्यांसमोर ठेवून त्यांना कंत्राटं दिली जातात.
आज शहरामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना बंद जलवाहिनी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रेडझोनचा गंभीर प्रश्न आहे. तोदेखील सोडवायचा आहे. अनेक विकासकामे करण्याची संधी आहे. मात्र, महापालिकेवर मोठ्या प्रमाणावर कर्ज झाले आहे. हे सगळे थांबवायचे असेल तर आपल्या विचाराचे नगरसेवक सभागृहात हवे. महापालिकेत सत्ता नसतानादेखील शहरातील अनेक कामे मार्गी लावली आहेत. तळवडेत ५९ एकर गायरान जागा आपण हस्तांतरित केली. त्या ठिकाणी बायोडायव्र्व्हिसिटी पार्क होत आहे. आपण ३२ गुंठे जागा महावितरणला दिली. त्यामुळे उद्योगांचे प्रश्न सुटले. येत्या निवडणुकीमध्ये महापालिकेची सत्ता हातात द्या. अशी अनेक कामे आपल्याला करून नागरिकांचे जीवन सुखकर करायचे आहे, असेही ते म्हणाले.
दादागिरी, दमबाजीला बळी पडू नका
पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्यांवर बोलत असताना पवार म्हणाले, आज शहरामध्ये दहशतीचे वातावरण आहे. या ठिकाणी गुंडगिरी करत अनेकांना दम दिला जात आहे. एवढ्या वर्षांच्या माझ्या राजकारणात मी कधीही फोडाफोडी केली नाही. मात्र, आता याला फोड, त्याला फोड असेच सुरू आहे. मी काही जणांना विचारले का पक्ष सोडला, तर ते म्हणाले दादा त्यांनी दमच तसा दिला आहे. हे काय बरोबर नाही. अशा पद्धतीने राजकारण करू नये. ही गुंडगिरी आता पिंपरी-चिंचवडकरांनी खपवून घेता कामा नये. दादागिरी, दमबाजीला बळी पडू नका. आपल्याला दहशत, दादागिरी नेस्तनाबूत करायची असल्याचेही पवार म्हणाले.
























































