उरणकरांच्या तिसऱ्या डोळ्याला विजेचा झटका; वीजजोडणीअभावी ७५ सीसीटीव्ही कॅमेरे बंद, नागरिकांची सुरक्षा रामभरोसे

उरण परिसरातील अनेक मोक्याच्या ठिकाणी बसविण्यात आलेले १०५ सीसी टी व्ही कॅमेऱ्यांपैकी ७५ कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. विजेच्या जोडणीअभावी हे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे मागील काही महिन्यांपासून धूळ खात पडले आहेत. पोलिसांच्या विविध तपास कामांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या तिसऱ्या डोळ्याला विजेचा झटका बसल्याने उरणकरांची सुरक्षा रामभरोसे आहे.

जेएनपीएअंतर्गत असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील खासगी पाच बंदरे, त्यावर आधारित उभारण्यात आलेल्या शेकडो कंटेनर यार्ड, सीएफएल, कंपन्यांमुळे उरण परिसर औद्योगिकदृष्ट्या संवेदनशील आहे. त्यानंतर आता मुंबई, उरण तालुक्याला जोडणाऱ्या अटल सेतू आणि रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबई-उरण अंतर तर अवघ्या ६० मिनिटांवर आले आहे. या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्याही वाढत असून गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्येदेखील वाढ झाली आहे. यामध्ये हत्या आणि चोरीच्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र ७५ कॅमेरे बंद असल्याने या गुन्ह्यांचा तपास करताना अनेक अडचणी येत आहेत.

पोलिसांचा पाठपुरावा
उरण परिसरातील अनेक मोक्याच्या व आवश्यक ठिकाणी १०५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यापैकी सध्याच्या घडीला फक्त ३० सीसीटीव्ही कॅमेरेच सुरू आहेत. वीजपुरवठ्याअभावी बसविण्यात आलेले ७५ सीसीटीव्ही कॅमेरे अद्यापही बंद आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यासाठी येथील स्थानिक पातळीवर ओएनजीसी, गृहविभाग, उरण नगर परिषद आणि संबंधित शासकीय विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे आहे अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांनी दिली.

उरण परिसरातील नागरीकरण वाढल्यामुळे गुन्हेगारी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे ही काळाची गरज बनली आहे. मात्र प्रशासनाने ही गरज गांभीर्याने घेतलेली नाही. शहरात ७५ सीसीटीव्ही कॅमेरे वीज जोडणी अभावी बंद असणे हे प्रशासनाचे फार मोठे दुर्दैव आहे, अशी नाराजी शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.