
तस्करी आणि बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन आयात-निर्यातीसाठी वापरण्यात आलेले शेकडो कंटेनर सीमा ALIA शुल्क विभागाने जेएनपीए बंदरात जप्त केले आहेत. या कंटेनरमधील माल सोडवण्यासाठी त्यांचे मालक पुढे न आल्यामुळे हे कंटेनर जेएनपीएच्या सीएफएसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहेत.
जेएनपीए बंदरातील पाचही खासगी बंदरे आणि त्यावर आधारित उरण परिसरात शेकडो सीएफएस, कंटेनर यार्ड, कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये डीआरए, सीमा शुल्क विभागाच्या विविध विभागाकडून विविध प्रकारच्या तस्करीत वापरण्यात आलेले कंटेनर जप्त केले जातात.
उरण परिसरातील कोणत्याही कंटेनर यार्डमध्ये तस्करीसाठी वापरण्यात आलेले असे शेकडो कंटेनर मालासह येथील जेएनपीएच्या विविध सीएफएसमध्ये ठेवण्यात आले आहेत. काही कंपन्या कंटेनरमधून बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन तस्करीच्या मालाची आयात-निर्यात करतात. अशा चोरट्या मालाची आयात-निर्यात करताना तस्करीत सहभागी असलेल्या कंपन्या आपले बिंग फुटले जाऊ नये यासाठी बनावट कंपन्यांच्या नावाचाही वापर करतात. तस्करीचा माल पकडला तर अशा बनावट कंपन्या माल ताब्यात घेण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे हे कंटेनर बेवारस म्हणून घोषित केले जातात.
आयात-निर्यातीच्या प्रकरणात जप्त करण्यात आलेले शेकडो कंटेनर येथील सीएफएसमध्ये ठेवण्यात आले आहेत. ते ताब्यात घेण्यासाठी कोणतीही कंपनी तयार नसल्याने हे कंटेनर अनेक वर्षांपासून जेएनपीएच्या विविध कंटेनर यार्डमध्ये धूळ खात पडून आहेत. सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात असलेल्या अशा कंटेनरची संख्या सध्या वाढतच चालली असल्याचे येथील प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
























































