
सध्याच्या घडीला ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत आहे. चित्रपटातील अक्षय खन्नाच्या अभिनयाने जगभरात त्याचा डंका जोरात वाजू लागला आहे. त्यामुळेच धुरंधर चित्रपटानंतर आता अक्षयचा भाव चांगलाच वधारला आहे. या चित्रपटाच्या यशामुळे चित्रपट निर्मात्यांमध्ये अक्षय चित्रपटात असायला हवा असा प्रयत्न सुरु झालेला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून अक्षय खन्ना आता दृश्यम 3 या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात होते. याआधी दृश्यम 2 मध्ये अक्षय छोटेखानी भूमिकेत चमकला होता. परंतु तरीही अक्षयला दृश्यम 2 मधून फारशी ओळख मिळाली नव्हती. परंतु सध्याच्या घडीला अक्षय हा धुरंधरमुळे घराघरात पोहोचला आहे.
हाती आलेल्या बातमीनुसार, अक्षय खन्नाने दृश्यम 3 चित्रपटातून निर्मात्यांशी झालेल्या मतभेदामधून माघार घेतल्याचे म्हटले जात आहे. अक्षय खन्नाने अशी इच्छा बोलून दाखवली होती की, त्याला दृश्यम 3 मध्ये केसांचा विग लावायचा आहे. परंतु निर्माते तसेच क्रिएटीव्ह टीमने त्याची ही मागणी फेटाळून लावली. अक्षयने दृश्यम 2 मध्ये तरुण अहलावत याची भूमिका वठवली होती. त्यावेळी त्याने बिना केसांच्या विगमध्येच काम केले होते. म्हणूनच या चित्रपटातही त्याने विग घालू नये असे त्याला सांगण्यात आले होते. परंतु त्याने मात्र नापसंती दर्शवली. शिवाय अक्षयने मानधनामध्येही वाढ केल्यामुळे, निर्मात्यांशी त्याचे बिनसले.
चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी बॉलीवूड हंगामा ला सांगितले की, “आम्ही अक्षय सोबत चित्रपटासाठी करार केला. त्याच्याशी अनेक चर्चा केल्यानंतर त्याचे मानधन देखील निश्चित करण्यात आले. अक्षयने एक अट घातली होती की, त्याला चित्रपटामध्ये विग घालण्याची इच्छा आहे. परंतु विग घालणे मूळ भागाशी आणि कथेशी सुसंगत राहणार नाही.” असे त्याला सांगण्यात आले. अधिक बोलताना कुमार मंगत पाठक म्हणाले, अक्षयच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याला सल्ला दिला की, विग घालल्याने तो अधिक स्मार्ट दिसेल. यानंतर, अक्षयने पुन्हा तीच मागणी केली. दिग्दर्शकाने यावर सहमती दर्शवली आणि त्याच्याशी या विषयावर चर्चा करण्यास तयार झाले. परंतु तरीही, अक्षयने अचानक चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.”
निर्माते म्हणाले, “अनेकांनी मला इशारा दिला होता की, अक्षयच्या अव्यावसायिक वृत्तीमुळे सेटवर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यानंतर मी त्याला ‘दृश्यम २’ साठी साइन केले. या चित्रपटानंतर त्याला मोठ्या प्रोजेक्ट्सच्या सर्व ऑफर मिळाल्या. त्याआधी तो 3-4 वर्षे घरी बसला होता. निर्मात्यांच्या मते, अक्षय स्वतःला सुपरस्टार मानू लागला आहे. त्याला वाटते की ‘धुरंधर’ त्याच्यामुळे हिट झाला, तर त्याच्या यशामागे अनेक कारणे होती. जर तो खरोखरच सुपरस्टार असेल तर त्याने एकट्याच्या जीवावर मोठ्या बजेटचा चित्रपट हिट करुन दाखवावा.
अक्षयने दृश्यम- 3 या चित्रपटासाठी आगाऊ रक्कम घेऊन चित्रपट करण्यास शूटिंगच्या 10 दिवस आधी नकार दिला. सध्याच्या घडीला जयदीप अहलावतने आता अक्षयची जागा घेतली आहे. या विषयावर अधिक बोलताना कुमार मंगत पाठक म्हणाले, अक्षयच्या वागण्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे, म्हणून त्याने त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे आणि त्याला नोटीस पाठवली आहे. तथापि, त्याला अद्याप यावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.























































