दाट धुक्यामुळे दिल्लीत विमान वाहतुकीचे तीनतेरा; 130 उड्डाणे रद्द, 8 विमानांचे मार्ग बदलले, हवामान विभागाकडून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. हाडं गोठवणारी थंडी आणि दाट धुक्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही झाला आहे. सोमवारी सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाट धुक्यामुळे दृश्यमानता शून्य झाली होती. याचा थेट फटका विमान वाहतुकीवर झाला असून जवळपास 128 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर खराब हवामानामुळे 8 विमानांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

दिल्ली विमानतळावरील सुमारे 178 विमानांच्या उड्डाणाला आणि 69 विमानांच्या आगमनाला विलंब झाला आहे. अत्यंत कमी दृश्यमानतेतही विमानांचे सुरक्षित लँडिंग व्हावे यासाठी विमानतळ प्रशासनाने ‘कॅट थ्री’ (CAT III) नियमांनुसार कार्यवाही सुरू केली आहे. तरीही दाट धुक्यामुळे वेळापत्रकात मोठे बदल झाले आहेत.

दाट धुक्याचा परिणाम केवळ विमानांवरच नाही, तर रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. उत्तर हिंदुस्थानात येणाऱ्या आणि जाणाऱ्या 100 पेक्षा अधिक गाड्या उशिराने धावत असून प्रवाशांना स्थानकावर तासन्तास वाट पाहावी लागत आहे.

दरम्यान, इंडिगो (IndiGo), एअर इंडिया (Air India) आणि स्पाइसजेट (SpiceJet) यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या विमानाची सद्यस्थिती (Flight Status) तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिल्लीसाठी ऑरेंज अलर्ट जारी

हवामान विभागाने (IMD) दिल्लीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. आज कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 7 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात 31 डिसेंबरपर्यंत दाट धुक्याचे सावट कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.