थर्टी फर्स्टला भुयारी मेट्रो रात्रभर धावणार, बेस्ट उपक्रमाच्या जादा बस मुंबईकरांच्या सेवेत

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मरीन ड्राइव्ह, गेट वे ऑफ इंडिया आणि गिरगाव चौपाटी परिसरात फिरण्यास जाणाऱया मुंबईकरांच्या सोयीसाठी भुयारी मेट्रो आणि बेस्ट उपक्रमसुद्धा सज्ज झाला आहे. थर्टी फर्स्टच्या संपूर्ण रात्री भुयारी मेट्रो अर्थात अक्वालाईनची प्रवाशी सेवा सुरू राहणार आहे. तसेच बेस्टच्या ज्यादा बसगाडय़ा धावणार आहेत.

नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱया मुंबईकरांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने रात्रभर सेवा सुरू ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही विशेष सेवा 31 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजल्यापासून सुरू होईल आणि 1 जानेवारी 2026 रोजी पहाटे 5.55 वाजेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर नियमित मेट्रो सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना 31 डिसेंबर रोजी सकाळी सुरू झालेली सेवा 1 जानेवारीच्या रात्रीपर्यंत सलग उपलब्ध मिळणार आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. अशा वेळी रस्त्यांवरील वाहतूक काsंडी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष सेवेचे नियोजन केले आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोचा हा रात्रभराचा प्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे.

बेस्टच्या 25 जादा बसगाडय़ा

बेस्ट उपक्रमाने गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई खाडी, मार्वे चौपाटी इत्यादी समुद्रकिनाऱयांवर जाणाऱया प्रवाशांच्या सोयीसाठी 25 जादा बसगाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 10 वाजल्यापासून 12.30पर्यंत बसमार्ग क्र. सी-86, 203, 231 तसेच वातानुकूलित बसमार्ग क्र. ए-21, ए-112, ए-116 ए-247. ए-272. ए-294 या मार्गांवर अतिरिक्त बसफेऱया चालवण्यात येणार आहेत. तसेच ‘हेरीटेज दूर’ या बसमार्गावर 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते गुरुवारी पहाटेपर्यंत प्रवाशी प्रतिसादाच्या उपलब्धतेनुसार विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत.