
मुंबईतील हवेची गुणवत्ता सोमवारीही खराब श्रेणीत नोंद झाली. शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 273 अंकांवर पोहोचला होता. शहरात सकाळच्या सुमारास धुक्याचा दाट थर पसरल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. याचा मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या लोकांना अधिक त्रास झाला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणकारी बांधकाम प्रकल्प तसेच उद्योगधंद्यांवर कारवाई सुरू केली. मात्र त्याचा सकारात्मक परिणाम मुंबईच्या वातावरणावर झालेला नाही.
ठिकठिकाणी रस्त्यांवर केलेल्या खोदकामामुळे हवेतील धुलीकण वाढले आहेत. ते धुलीकण थोपवण्यासाठी पाण्याचा मारा केला जात नसल्याने हवेची गुणवत्ता ‘खराब’ श्रेणीतच आहे. सोमवारी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 273 अंकांवर नोंद झाला. वाढलेले धुलीकण, धुरके याचा त्रास लहान मुले, वृद्ध नागरिक आणि श्वसनविकाराच्या रुग्णांना सोसावा लागत आहे. प्रदूषणाच्या गंभीर पातळीमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

























































