मतदानाला यायचे नव्हते तर पैसे का घेतले? भाजपच्या विजयी उमेदवाराचा भररस्त्यात मतदाराला सवाल

ना खाऊंगा ना खाने दुँगा असा टेंभा मिरवणाऱया भाजपचा बदलापूर नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बुरखा फाटला आहे. येथून निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवार प्रणिता कुलकर्णी यांनी एका मतदाराला ‘तुम्हाला मतदानाला यायचे नव्हे तर पैसे का घेतले,’ असा सवाल केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार कसे निवडून आले हेदेखील चव्हाटय़ावर आले आहे.

बदलापूरमधील रमेशवाडी या भागातून भाजपच्या उमेदवार प्रणिता कुलकर्णी या निवडून आल्या. निवडणुकीत भाजपने मोठय़ा प्रमाणावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात येत होता. पण आता तर व्हिडीओच्या द्वारे त्याचा पुरावाच समोर आला आहे. निवडून आल्यानंतर प्रणिता कुलकर्णी यांनी भररस्त्यात एका मतदाराला तुम्हाला मतदानाला यायचे नव्हते तर पैसे का घेतले? तुमची घरं आम्ही भरायची काय? तुमच्या घरी आम्ही भांडी घासायची काय, असे एकामागून एक सवाल केले. त्यावरून मतदार व भाजपच्या विजयी उमेदवार यांच्यात चांगली शाब्दिक बाचाबाची झाली. सध्या याच व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून निवडणूक आयोगाकडून युद्धपातळीवर पूर्वतयारी सुरू आहे. सोमवारी लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग शाळा संकुल येथे निवडणूक कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले.