
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपकडून प्रतिसादच मिळत नसल्याने महायुती फुटली आहे. ‘भाजपची महायुतीत निवडणूक लढवण्याची तयारीच नव्हती’ अशी नाराजी अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली. शिंदे आणि अजित पवार गट एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी आज जाहीर केले.
महायुतीत जागा वाटपावरून खटके उडत होते. बरीच वाट पाहूनही भाजपकडून कुठलाच निरोप न आल्याने, ते स्वबळावर निवडणूक लढवणार असे संकेत मिळताच तीन-चार दिवसांपासून शिंदे गटाने अजित पवार गटाशी हातमिळवणीचे प्रयत्न सुरू केले. या दोन्ही गटांनी आज एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह दोन्ही गटाच्या पदाधिकाऱयांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली, तेव्हा भाजपबद्दलची नाराजीही प्रकट केली.
भाजपच्या मनात काय होतं माहीत नाह़ी कदाचित आम्ही सोबत असलो नसलो तरी त्यांना फरक पडणार नसेल म्हणून त्यांनी निर्णय घेतला असेल, असे झिरवाळ यांनी म्हटले. विधानसभेला नाशिकमध्ये सगळ्यांच्या मदतीनेच भाजपाला भरघोस यश मिळाले, ते या निवडणुकीत आम्हाला सामावून घेतील, असे वाटत होते. कालपर्यंत महायुतीत निवडणूक लढवण्याची अपेक्षा होती, पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही, म्हणून आता दोन्ही गट एकत्र निवडणुकीला सामोरे जाऊ. आमच्यात चर्चा सुरू झाली असून रात्रीतून जागांचा प्रश्न सोडवून निवडणूक लढवू, सोबत घटक पक्ष असतील, असेही त्यांनी सांगितले. भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही, असे माजी खासदार समीर भुजबळ यांनीही स्पष्ट केले.


























































