
भाजपचा अॅनाकोंडा आपल्याला गिळत आहे, भाजपशी नातं तोडा… असे म्हणत मिंध्यांच्या कार्यालयात जिल्हाप्रमुखांसह, महिला कार्यकर्त्यांनी रडारड केली. आपल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्यामुळे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे माध्यमांसमोर ढसाढसा रडले. एवढेच नाही तर निवडणुकीतून माघार घेण्याचीही घोषणा करून ते फणफणत घरी गेले. त्यानंतर मिंध्यांचे खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल हे जंजाळ यांची समजूत काढण्यासाठी पोहोचले. भुमरे, जैस्वाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर जंजाळ आपल्या समर्थकांसह पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर धडकले. रात्री उशिरापर्यंत मिंध्यांचे कार्यकर्ते, भाजपशी युती तोडा, अशा घोषणा देत होते.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या जागावाटपावरून भाजप आणि मिंध्यांमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. भाजपचे मंत्री अतुल सावे आणि मिंध्यांचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जागावाटपच हायजॅक केले आहे. दोन्ही पक्षांत आलेल्या उपऱयांसाठी निष्ठावंतांचा बळी दिला जात आहे. त्याचबरोबर नेत्यांना आपापल्या वारसदारांना संधी द्यायची असल्याने निष्ठावंतांना खडय़ासारखे उचलून बाजूला ठेवण्यात येत असल्यामुळे भाजप आणि मिंधे गटात असंतोष उफाळून आला आहे.
घोटाळय़ांमुळे संजय शिरसाट भाजपला शरण
पालकमंत्री संजय शिरसाट हे वेगवेगळय़ा टाळय़ात अडकले असून, त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी सपशेल भाजपसमोर शरणागती पत्करली असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. ज्या कार्यकर्त्याने विधानसभेत काम केले नाही, त्याचा पत्ता साफ करण्याचे धोरण शिरसाटांनी स्वीकारले आहे. त्यामुळेच अनेक प्रभाग त्यांनी भाजपच्या पदरी टाकले. भाजपच्या मर्जीने मिंध्यांचे उमेदवारही ठरवण्यात आल्याची संतप्त भावना कार्यकर्त्यांची आहे.





























































