
भाजपने बंडखोरी टाळण्यासाठी रातोरात गपचुप एबी फॉर्म वाटून टाकले. घराणेशाहीला थारा देणार नाही असे सांगितले जात असताना भाजपने अखेर घराणेशाहीचा टेंभा मिरवला आहे. दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांना तिकीट देण्यात आली असून वादग्रस्त उमेदवारांऐवजी त्यांच्या घरात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपचे निष्ठावंतांच्या नशिबी सतरंजी उचलण्याची वेळ येणार आहे.
भाजप आणि शिंदे गट यांच्यात अद्याप जागावाटपाचा पेच सुटलेला नसतानाच भाजपने घाईघाईत उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली. पुण्यातील 165 जागांपैकी सुमारे 100 जणांना एबी फॉर्म दिल्याची चर्चा आहे. मात्र या यादीत जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते कमी आणि घराणेशाही जास्त दिसते, अशी कुजबुज पक्षात सुरू आहे. पुणे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी प्रभाग क्रमांक 24 मधून अर्ज दाखल केला आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट आणि दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांना प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 21 मधून आरक्षण डावलून श्रीनाथ भिमाले यांना संधी दिली आहे.
आमदार रासनेंनाही किंमत नाही?
आमदार हेमंत रासने यांच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलल्याने त्याने सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. आमदारांचेही ऐकले जात नसेल, तर सामान्य कार्यकर्त्याची काय किंमत? असा सवाल भाजपच्या गोटात विचारला जात आहे.

























































