
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार आहेत. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय झाला. बलाढय़ शक्तीच्या विरोधात लढायचे असेल तर एकत्र यायला हवे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथे सर्वसाधारण सभेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते. या बैठकीसाठी रोहित पवार आले असता बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. आम्ही कुठेही घडय़ाळाच्या चिन्हावर लढणार नाही. आमचे उमेदवार तुतारी आणि घडय़ाळ या दोन्ही स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढवतील असे स्पष्ट केले.
प्रशांत जगताप यांनी शरद पवार गट सोडल्याच्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, प्रशांत जगताप हे चांगले पदाधिकारी होते. पण त्यांनी का आणि कशामुळे निर्णय घेतला याची वेगळी आणि मोठी कारणे आहेत. प्रशांत जगताप यांच्याबरोबरचे कार्यकर्ते होते त्यातील 95 टक्के कार्यकर्त्यांचे मत हे आपल्याला घडय़ाळाबरोबरच जावं लागेल या विचाराचे होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यांचाच हा निर्णय आहे.
महानगरपालिकेचा विषय आहे. विलीनीकरणाचा विषय असता तर संपूर्ण महाराष्ट्रात आमची युती झाली असती. पण तसं काही झालेलं आपल्याला दिसत नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येच कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचा घेतलेला हा निर्णय आहे.
शरद पवार कुठेच प्रचारात नसणार
या निवडणुकांच्या प्रचारामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे कुठेच असणार नाहीत. ते महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी नसतात हे आपल्याला माहीत आहे असे सांगून रोहित पवार म्हणाले, शरद पवार यांनी सांगितले आहे की, कार्यकर्त्यांना विचारात घ्या. त्याप्रमाणे निर्णय घ्या. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. नाशिकमध्ये अजित पवार यांचा पक्ष शिंदे गटाबरोबर एकत्र निवडणूक लढवत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आमचे जागावाटप ठरलेले आहे. परंतु ते सांगणार नाही. उद्या दुपारपर्यंत जागा वाटप आणि संख्या घोषित केली जाईल.

























































