
भाजपची सत्ता असलेल्या उत्तराखंडमध्ये ईशान्य भारतातील त्रिपुरा येथील विद्यार्थी अँजेल चकमा याची वर्णद्वेषी हल्ल्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरून विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून देशाला काळिमा फासणारी घटना, अशा शब्दांमध्ये सत्ताधाऱयांवर घणाघाती टीका केली आहे.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिले, की डेहराडून येथे अँजेल चकमा आणि त्याचा भाऊ मायकल याच्यासोबत घडलेला प्रकार म्हणजे एक भयानक वर्णद्वेषी गुन्हा आहे. द्वेष एका रात्रीत निर्माण होत नाही. सत्ताधारी भाजपच्या द्वेष पसरविणाऱया नेतृत्वाकडून ही अतिशय सामान्य बाब बनविण्यात आली आहे. हिंदुस्थान सन्मान आणि एकतेवर उभा आहे, भय आणि दुराचारावर नव्हे, असे राहुल गांधी यांनी लिहिले. डेहराडून येथे त्रिपुरातील विद्यार्थ्याची हत्या ही द्वेष पसरविणाऱया विकृत मानसिकतेचा परिणाम आहे. असे लोक सरकारच्या आश्रयामुळे मोकाट आहेत. यामुळे देशाची एकता आणि अखंडता धोक्यात येत आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली.
काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी ही देशाला काळिमा फासणारी घटना असल्याचे म्हटले. ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल म्हणाले की, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी देशाला कठोर कायदे करण्याची गरज आहे. त्रिपुरामध्ये तिपरा मोथा पक्षाचे अध्यक्ष प्रद्योत देबबर्मा यांनी आरोपींची माहिती देणाऱयांना 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, डेहराडून आणि त्रिपुराची राजधानी आगरतळामध्ये स्थानिकांनी अँजेल चकमा याला न्याय देण्याच्या मागणीसाठी पँडल मार्च काढला.
आधी चिनी म्हणून हिणवले, मग चाकूने मारले
मूळचा त्रिपुरातील अँजेल चकमा हा डेहराडूनमध्ये ‘एमबीए’ शिकत होता. तो आणि त्याचा लहान भाऊ मायकल हे 9 डिसेंबरला बाजारपेठेत जात असताना एका टोळक्याने त्यांना चिनी असे म्हणत अँजेलवर मारहाण केली आणि चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या अँजेलचा 14 दिवसांनी शुक्रवारी मृत्यू झाला.



























































